निवडणुकीच्या तोंडावर ''राजकीय भूकंप''

निवडणुकीच्या तोंडावर ''राजकीय भूकंप''

Published on

निवडणुकीच्या तोंडावर ‘राजकीय भूकंप’
वाळेकर गटासह काँग्रेस गटाचा भाजपमध्ये प्रवेश
अंबरनाथ, ता. १६ (वार्ताहर) : अंबरनाथच्या स्थानिक राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत मोठे शक्तिप्रदर्शन केले.

शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देत जिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर, युवानेता पवन वाळेकर, युवासेना संघटक चंद्रकांत मोटे, युवा अधिकारी आकाश वाळेकर, प्रकाश वाळुंज आणि रवींद्र पवार यांसह अनेक महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत भाजपचा झेंडा हाती घेतला. यासोबतच काँग्रेस पक्षातील बबलू सिंग आणि लक्ष्मीकांत सिंग यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवली येथे हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. हजारो महिला कार्यकर्त्यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे अंबरनाथमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला यामुळे मोठा धक्का बसण्याची चर्चा आहे, तर भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

तेजश्री करंजुले यांना बळ
भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी मैदानात असलेल्या तेजश्री विश्वजीत करंजुले यांना या पक्षप्रवेशाचा मोठा फायदा होणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने करंजुले यांची ताकद आणखी भक्कम झाल्याचे मानले जात आहे. लोकनेते गुलाबराव करंजुले पाटील यांनी आगामी निवडणुकीत भाजप अंबरनाथमध्ये मोठे यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.

Marathi News Esakal
www.esakal.com