रक्तटंचाईने जीव टांगणीला
रक्तटंचाईने जीव टांगणीला
उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
रवींद्र गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल, ता. १६ ः अत्यल्प प्रमाणात होणाऱ्या रक्तदान शिबिरांमुळे त्याचा फटका पनवेल तालुक्याला बसू लागला आहे. शहरातील सर्वच प्रमुख रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झाला असून, उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.
दिवाळीनंतर विविध कारणांमुळे रक्तदान शिबिरे भरवण्यात दुर्लक्ष झाले आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे संस्थांच्या शिबिरांची परंपरा खंडित झाली. अशातच यंदा पावसाचादेखील जोर असल्याने नियोजन विस्कळित झाले. परिणामी, रक्तपेढ्या नवीन संकलन करू शकल्या नसल्याने उपलब्ध रक्तसाठा अपुरा पडू लागला आहे. शहरातील श्री साई, रोटरी क्लब, जीवन रेख, सद्गुरू, महात्मा गांधी मिशन मेडिकल, संजीवनी, स्वस्तिक, साई रक्त केंद्र, बी. व्ही. लिमये रोटरी क्लब ऑफ नवीन पनवेल अशा सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा अत्यल्प आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये तर विशिष्ट रक्तगटांच्या पिशव्यांचे प्रमाण ‘शून्य’ असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू आहे.
-------------------------------------
पनवेल तालुका आवशक साठा उपलब्ध साठा
रुग्णालये दररोज ७० ते ८० निम्म्याहून कमी
खासगी रक्तपेढ्या २० ते ३० १२ ते १८
----------------------------
थॅलेसेमिया रुग्णांना त्रास
पनवेल तालुक्यात १०० ते १५० थॅलेसेमिया रुग्ण आहेत. या रुग्णांना नियमित अंतराने रक्त देणे अत्यावश्यक आहे. असह्य अशक्तपणा, थकवा, पिवळेपणा, ताप, श्वास घेण्यास त्रास, अशा गंभीर लक्षणांवर नियंत्रणासाठी रक्त संक्रमण एकमेव उपचार आहे, पण टंचाईमुळे अनेक रुग्णांना नियोजित तारखेला रक्त मिळत नसल्याने उपचारांमध्ये विलंब होत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे.
--------------------------------
गणेशोत्सवानंतर टंचाई
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे झाली होती. त्या काळात साठा भरून निघाला होता, परंतु त्यानंतरचा पाऊस, नंतरच्या सुट्ट्या आणि शिबिरांची अनुपस्थितीमुळे रक्तसंकलन थांबल्याने रक्त संकलनात मोठ्या अडचणी येत आहेत.
---------------------------------
नातेवाइकांची धावपळ
मुंबई-पुणे दु्तगती महामार्ग, सायन पनवेल महामार्ग, पनवेल-गोवा, अलिबाग, जेएनपीटी रस्त्याने अपघात होत असतात. या अपघातानंतर अशा गंभीर अपघातातील रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासते. या रुग्णांना रक्ताची पिशवी मिळवण्यासाठी नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे.
---------------------------
स्वेच्छेने रक्तदान करा!
रक्ताची मागणी, तुटवडा यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. यामुळे थॅलेसेमिया, गरोदर माता, अत्यावश्यक शस्त्रक्रिया, कर्करोग पीडित रुग्णांना रक्तपिशवी देण्यात अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------
ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या प्रसूतीच्या शस्त्रक्रिया होतात. त्यासाठी अलिबाग येथील संकलन केंद्रातून रक्तपुरवठा होतो, परंतु सध्या रक्ताचा साठा अत्यल्प असल्याने अनेक तातडीच्या शस्त्रक्रियांचे वेळापत्रक बदलावे लागले आहे.
- डॉ. अशोक गीते, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पनवेल
-------------------------
पनवेलमधील सामाजिक संस्था, नागरिकांनी रक्तदान शिबिर करावे. संस्थेकडून दर तीन महिन्यांनी शिबिर घेण्यात येते.
- मनोहर सचदेव, श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट, पनवेल

