वाशाळा गावात बिबट्याचा संचार

वाशाळा गावात बिबट्याचा संचार

Published on

शहापूर, ता. १६ (वार्ताहर) : शहापूर तालुक्यातील वाशाळा वनपरिक्षेत्र हद्दीतील जंगल भागात मुक्त वावर करणारा बिबट्या आता गावागावांत फिरून कुत्रा, कोंबड्या, शेळी, गाय, बैलांची शिकार करू लागला आहे. त्यामुळे भात, नाचणी, वरईचे पीक काढण्यासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांसह ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
वाशाळा वनपरिक्षेत्र हद्दीतील पाटोळ, कोळीवाडा गावांच्या परिसरात सतत आठ दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे. येथील दामू धोकटे, एकनाथ शिद या शेतकऱ्यांच्या शेळ्यांची बिबट्याने शिकार केल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी केल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एकनाथ रोंगटे यांनी सांगितले. शेळी, मेंढी व जनावरांची शिकार होऊ नये, यासाठी येथे गावकरी दिवस रात्र पहारा देऊन रात्री फटाके वाजवून बिबट्याला पळवून लावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्याचे वनपाल मुकेश भोईर यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com