दिव्यात दुमजली चाळीची गॅलरी कोसळली

दिव्यात दुमजली चाळीची गॅलरी कोसळली

Published on

दिव्यात दुमजली चाळीची गॅलरी कोसळली
अग्निशमन दलाकडून ३० व्यक्तींची सुटका
कळवा, ता. १६ (बातमीदार) : दिव्यातील दिवा महोत्सव मैदानाजवळील एका जुन्या दुमजली चाळीची गॅलरी कोसळल्याची घटना शनिवारी (ता. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत अडकलेल्या सुमारे ३० व्यक्तींची अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सुखरूप सुटका केली.
दिव्यातील दिवा महोत्सव मैदानाजवळ असलेली सावळाराम स्मृती नावाची दुमजली चाळ आहे. ही चाळ सुमारे २० ते २५ वर्षे जुनी असून, त्यात २१ सदनिका आहेत. साधारण ५० ते ५५ व्यक्ती या चाळीत राहत होत्या. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक पहिल्या मजल्यावरील गॅलरी कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दिवा अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या ३० जणांना शिडीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.
कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, महापालिका प्रशासनाने ही चाळ धोकादायक म्हणून घोषित केली आहे. चाळीतील सर्व रहिवासीयांना सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com