.. तर स्थानकाची स्वच्छता राखणेही प्रत्येक प्रवासीची जबाबदारी नाही का?

.. तर स्थानकाची स्वच्छता राखणेही प्रत्येक प्रवासीची जबाबदारी नाही का?

Published on

रेल्वेचा प्रवाशांना स्वच्छतेचा धडा
तीन पुरस्कारांचे मानकरी तरी ठाणे स्थानकात अस्वच्छताच
पंकज रोडेकर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ ः मागील काही वर्षांत ठाणे रेल्वेस्थानकाला तीन वेळा स्वच्छतेची शिल्ड पुरस्काराने गौरान्वित केले आहे. तरीसुद्धा ठाणे रेल्वेस्थानकातील अस्वच्छतेवरून वारंवार टीका केली जाते. हे लक्षात घेत ठाणे रेल्वे प्रशासनाने स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी रेल्वेची जशी आहे. तशीच ती या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचीही आहे. तुम्हाला स्वच्छता पाहिजे, तर तुमच्यापासून सुरुवात करा, तरच स्थानक निश्चित स्वच्छ दिसेल, असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगितले आहे.
ठाणे स्थानकात एकूण ११ फलाट आहेत. मध्य आणि हार्बर यांच्याबरोबर मेल-एक्स्प्रेस या सेवा सुरू असून, दररोज सहा ते सात लाख प्रवासी ये-जा करतात. गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांसाठी पादचारी पूल, सरकते जीन आणि लिफ्ट यासारख्या सुविधांची मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. त्यातच सद्यस्थितीत स्थानकात विकासकामेही सुरू आहेत, परंतु स्थानकावरील अस्वच्छतेवरून प्रशासनावर टीका करण्यात येते. यावर स्थानकातून प्रवास करताना, कचरा तुम्ही करता. प्रत्येक कोपऱ्यात गुटखा खाऊन थुंकता. असेच तुम्ही आपआपल्या घरात अस्वच्छता करता का, असा संतप्त सवाल केला आहे. स्थानकात स्वच्छता करणारेही माणसे आहेत, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

स्वच्छतेसाठी ७३ जणांचे हात झटतात
स्थानकातील दररोजच्या स्वच्छतेसाठी ७३ जणांची फौज तैनात आहे. तीन शिफ्टमध्ये स्थानकातील प्रत्येक फलाटांची स्वच्छता केली जाते. त्याचबरोबर १० प्रकारच्या २७ मशीनचा वापर स्वच्छतेसाठी केला जातो. दिवसाला स्थानकात एक कचऱ्याची गाडी (डम्पर) भरेल इतका कचरा जमा होतो. तसेच गुटख्याच्या पिचकारीने सरकते जिने, प्रत्येक कॉर्नर, ब्रिजच्या सुरक्षित लोखंडी जाळ्या आदी स्वच्छ केल्यानंतरही तेथे थुंकून त्या रंगताना दिसतात.

ही आहेत कचरा वाढल्याची कारणे
सध्या अन्नपदार्थ पाकीट पॅकिंगमध्ये दिले जाते. त्यातच कुरकुरे, गुटखा, सॉफ्ट ड्रिंक ग्लास यासारख्या पदार्थांसाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे तो कचरा डब्यात टाकण्याऐवजी उभे राहतात किंवा बसल्या जागी टाकला जात आहे. अशाप्रकारे कचरा वाढत आहे. त्यातच गर्दुल्ले आणि भिकारी हे स्थानकात अस्वच्छता पसरतात. त्यांनाही आळा घालणे गरजेचे आहे.

कोणीही अस्वच्छतेबाबत ठाणे रेल्वेस्थानकाकडे बोट दाखवत आहे. स्वच्छता राखणे ही जशी रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. तशी ती स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवासीची जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखली तर स्थानक अस्वच्छ होणार नाही. त्यामुळे स्थानक स्वच्छ ठेवणे ही जबाबदारीही रेल्वे प्रशासनाबरोबर तुमचीही आहे.
- अर्पणा देवधर, प्रबंधक, ठाणे रेल्वेस्थानक

पंतप्रधान मोदी यांच्यामार्फत स्वच्छतेबाबत आवाहन केले जात आहे. त्यानुसार प्रवासी संघटनाही जनजागृती मोहीम राबवत आहे, मात्र प्रवासीवर्गात खऱ्या अर्थाने स्वच्छतेचे महत्त्व रुजत नाही, तोपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था

जसे आपण घरात कचरा करत नाही, तसा आपण रेल्वेस्थानकात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणीही कचरा करणार नाही, हे प्रत्येकाने मनाशी ठरवले पाहिजे. प्रत्येक प्रवाशाने आपली जबाबदारी ओळखणे तितकेच गरजेचे आहे. वेळ गेलेली नाही. आजपासून सुरुवात केली, तर निश्चित बदल घडेल आणि उठणारी बोटे पुन्हा वरच येणार नाहीत.
- एक प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com