उमेदवारांची आज उडणार झुंबड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : उमेदवारी अर्ज भरण्याची घटिका संपत आली तरी अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूरमध्ये राजकीय महायुती, आघाडीचे समीकरण जुळलेले नाही. त्यामुळे कालपर्यंत सबुरीच्या भूमिकेत असलेल्या इच्छुकांचा धीर सुटला असून, आता उद्या सोमवारी (ता. १७) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची धांदल आणि झुंबड उडण्याची शक्यता आहे.
अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदेसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या २९ प्रभागांतून ५९, तर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या २४ प्रभागांतून ४९ नगरसेवक निवडून येणार आहेत. १० वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत पहिल्यांदाच येथील मतदार आणि उमेदवार पॅनेल पद्धतीला सामोरे जाणार आहेत, मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होऊन सहा दिवस उलटले तरी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
अंबरनाथमध्ये शनिवार (ता. १५)पर्यंत केवळ चारच, तर कुळगाव-बदलापूरमध्ये ११ अर्ज दाखल झाले होते. रविवारी सुट्टीच्या दिवशीही अर्ज दाखल करण्यासाठी स्थानिक निवडणूक कार्यालयाचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत. त्यालाही फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. त्यामुळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबरला नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदांसाठी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे. परिणामी प्रशासकीय ताण वाढण्याची चिन्हे आहेत.
राजकीय संभ्रमाचा फटका
अर्ज दाखल कण्याची मुदत संपत आली तरी शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात महायुती जाहीर झालेली नाही. वरिष्ठ पातळीवर कोणताच निर्णय न झाल्याने स्थानिक पातळीवर महायुतीत दोन गट पडले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप असे दोन असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपल्या सोयीनुसार अंबरनाथ, बदलापूरमध्ये युती केली आहे. बदलापुरात भाजपसोबत, तर अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत राष्ट्रवादी अजित पवार गट गेला आहे. अंबरनाथमध्ये महाविकास आघाडी होणार आहे. बदलापूरचे चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे जागावाटप त्या दृष्टीने झाल्याचे समजते. त्या अनुषंगाने सोमवारीच अर्ज भरण्यात येणार असल्याचे दिसते.
नगराध्यक्षपदासाठी शक्तिप्रदर्शन
बदलापूर नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये चुरस वाढणार आहे. कोणाची ताकद सर्वात जास्त आहे, हे दाखवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. बदलापूरमध्ये रविवारी (ता. १६) भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट युतीच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांनी अर्ज दाखल केला. या वेळी दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दरम्यान, उपनगराध्यक्षपदाच्या दावेदार असलेल्या प्रियांका दामले यांनी शनिवारीच (ता. १५) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या तगड्या आव्हानाला शिवसेना शिंदे गट साेमवारी उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. पक्षाचे नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवार सोमवारी आपला अर्ज दाखल करणार असून, या वेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.

