राखीव वनक्षेत्रातून रहिवासी भाग वगळणार
भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील राखीव वनक्षेत्र घोषित झालेले रहिवासी भाग वनक्षेत्रातून वगळण्यात येईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे. राखीव वनक्षेत्रात येत असलेल्या रहिवासी क्षेत्रात विकासकामे करणे महापालिकेला अशक्य बनले आहे. यासाठी रहिवासी भाग राखीव वनक्षेत्रातून वगळण्यात यावा, अशी मागणी आहे. या मागणीला वनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मिरा-भाईंदरमधील कांदळवनाचा परिसर असलेले क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. या क्षेत्रात कोणतेही काम करण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे त्यातील काही परिसर सीआरझेडनेदेखील बाधित आहे, मात्र हा परिसर राखीव वनक्षेत्र अथवा सीआरझेड घोषित होण्याआधीपासून त्या भागात कित्येक वर्षांपासून रहिवासी वस्ती आहे, तर काही ठिकाणी झोपडपट्ट्या झाल्या आहेत. तेथील रहिवाशांच्या सुविधेसाठी महापालिकेने रस्ते, नाले, समाजमंदिरे, स्वच्छतागृहे बांधली आहेत, त्याचप्रमाणे सार्वजनिक दिव्यांची व्यवस्थादेखील केली आहे, परंतु आता हा परिसर राखीव वनक्षेत्र घोषित झाल्यानंतर या सर्व पायाभूत सुविधांची देखभाल-दुरुस्ती करणे अशक्य होऊन बसले आहे. या मालमत्तांचा स्थानिकांकडून नियमितपणे वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे अन्यथा जीवित अथवा वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे.
काही भागात महापालिकेकडून नवी विकासकामे, तसेच मालमत्तांची पुनर्बांधणी प्रस्तावित करण्यात आली असून, त्यांची निविदा प्रक्रियादेखील करण्यात आली आहे, परंतु राखीव वनक्षेत्रात वन विभाग, तसेच कांदळवन समितीच्या परवानगीखेरीज कोणतेही काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. परवानगीशिवाय काम केल्यास महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे सध्या महापालिकेकडून या भागात कोणतीही कामे केली जात नाहीत. हा संपूर्ण परिसर दाट लोकवस्तीचा, तसेच त्या ठिकाणी २००० आधीपासून वस्ती असल्यामुळे या ठिकाणी स्थळ पाहणी केल्यानंतरच राखीव वनक्षेत्राची हद्द निश्चित करावी, तसेच रहिवासी भाग वगळून उर्वरित भाग राखीव वनक्षेत्रातून वगळण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय
गेल्या आठवड्यात मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी या विषयावर वनमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी (ता. १५) मिरा-भाईंदरमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. त्यात माजी नगरसेवक पंकज पांडे यांनीदेखील रहिवाशांसोबत नाईक यांची भेट घेत समस्या मांडली. त्यावर राखीव वनक्षेत्रातून रहिवासी क्षेत्र वगळण्यात येईल, त्यासाठी रहिवासी क्षेत्र राखीव वनक्षेत्र संरक्षक भिंत बांधून स्वतंत्र करण्यात येईल, जेणे करून रहिवासी क्षेत्रात विकास कामे, त्याचप्रमाणे मालमत्तांच्या देखभाल-दुरुस्तीचा मार्ग मोकळा होईल, असे आश्वासन वनमंत्र्यांनी दिले, अशी माहिती पंकज पांडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

