बिबट्यापासून सतर्क होण्यासाठी एआयची नजर
मोखाडा, ता. १६ (बातमीदार) : तालुक्यातील वेगवेगळ्या भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची घटनादेखील घडली आहे. त्यातच वेगवगळ्या भागात संध्याकाळ आणि रात्री बिबट्याचे अनेकांना दर्शन घडले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक भेदरले आहेत. बिबट्याची माहिती नागरिकांना व्हावी, म्हणून वन विभागाने वारघडपाडा येथे एआय तंत्रज्ञानाचे सौरऊर्जैवर चालणाऱ्या कॅमेऱ्यासह सायरन बसवला आहे. तसेच वेगवेगळ्या भागात वन कर्मचाऱ्यांची गस्ती पथके निर्माण केली असून, नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
मोखाड्यात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याने वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घातला आहे. संध्याकाळच्या सुमारास एका दुचाकीस्वारावर हल्लादेखील केला आहे. शेतकऱ्यांच्या बकऱ्या, वासरे आणि कुत्रे फस्त केले आहेत. बिबट्याच्या वावराबाबत पाच ते सहा गावांमधून वन विभागाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने गावोगावी जाऊन बिबट्यापासून कसे रक्षण करण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन सुरू केले आहे. तसेच बिबट्याचा सततचा वावर असलेल्या वारघडपाड्याच्या पुढे एआय तंत्रज्ञान आधारित कॅमेरा बसवला आहे.
सौरऊर्जेचा वापर
हा कॅमेरा सौरऊर्जेवर चालणारा आहे. त्याला एक सायरन जोडण्यात आला आहे. तसेच त्यावरील सर्व हालचाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर टिपल्या जात आहेत. १०० मीटरच्या अंतरावर बिबट्याची चाहूल लागताच हा कॅमेरा व सायरन कार्यरत होऊन आवाज देत नागरिकांना सतर्क करत आहेत.
वारघडपाडा येथे एआय तंत्रज्ञानाचा कॅमेरा व सायरन बसविण्यात आले आहे. यासह दिवस-रात्र वन कर्मचाऱ्यांची गस्त ठेवण्यात आली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरादेखील आणला आहे, मात्र केंद्र सरकारच्या परवानगीनंतर तो लावण्यात येणार आहे. गावोगावी शाळांसह वाडीवस्तीवर कर्मचारी नागरिकांचे प्रबोधन करत आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काही नागरिक बिबट्याच्या वावराचा बनावट व्हिडिओ तयार करत असल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.
- विनोद दळवी, वन क्षेत्रपाल, मोखाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

