धुळीकणाचे आक्रमण

धुळीकणाचे आक्रमण

Published on

धूलिकणांचे आक्रमण
पनवेलमध्ये हवेचे प्रदूषण, बांधकाम व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : हवेतील धुळीचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रदूषण रोखण्यासाठी इमारतींच्या बांधकामांवेळी खबरदारी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. पनवेल पालिकेने १०० पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिकांना नोटिसाही बजावल्या आहेत, मात्र त्यानंतरही नियमांचे उल्लंघन होत असल्याने महापालिकेतील विभाग अधिकाऱ्यांच्या बघ्याच्या भूमिकेविरोधात संतापाचे वातावरण आहे.
काही वर्षांपासून नवी मुंबईसह, पनवेल परिसरात धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. पनवेल पालिकेच्या हद्दीतील सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेतील प्रदूषण वाढले आहे. या प्रदूषणाने अनेकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. तरीसुद्धा शहरात नियमांचे उल्लंघन करत इमारतींची बांधकामे वेगाने सुरू आहेत. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार पनवेल पालिकेच्या हद्दीतील कामोठे, खांदा कॉलनी, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल शहर परिसरातील १०० पेक्षा बांधकाम व्यावसायिकांनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. या विकसकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत, मात्र तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने पालिकेच्या कारवाईबाबतच आता शंका घेतली जात आहे.
----------------------------------------
येथे सर्वाधिक तक्रारी
कामोठे - १९
खांदा कॉलनी - १६
खारघर - १९
कळंबोली - १७
नवीन पनवेल - ७
पनवेल - ११ हून अधिक
----------------------------------------
९५ बांधकामांवर यंत्रणाच नाही
इमारतीचे बांधकाम करताना हवेत उडणाऱ्या धूलिकणांवर नियंत्रणासाठी सेन्सर आधारित मॉनिटर बसवणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळाला ही यंत्रणा जोडणे बंधनकारक आहे, मात्र ९५ बांधकाम व्यावसायिकांनी ही यंत्रणा बसवली नाही.
------------------------------------------------
भरारी पथक निष्प्रभ
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पनवेल महापालिकेने द्विसदस्यीय समितीसमोर भरारी पथक नियुक्त केले आहे. यात प्रभाग अधीक्षक हा पथक प्रमुख आहेत. मुख्य आरोग्य निरीक्षक, प्रभाग अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक असे चार जणांचे भरारी पथक तयार केले आहे, परंतु नोटीस देऊन झाल्यानंतर पुन्हा पथक त्या ठिकाणी फिरकले नसल्याने कारवाईबाबत पथकच उदासीन असल्याचे दिसून आले.
------------------------------
बांधकाम थांबवण्याचे अधिकार
बांधकाम ठिकाणांवर प्रदूषणासंबंधित प्रणाली लावण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाला बहुतांश सर्वच विकसकांनी बगल दिली आहे. अशा विकसकांवर पालिका बांधकाम थांबवण्याची कारवाई करू शकते, परंतु पालिकेचे विभाग अधिकारी फक्त वेळकाढूपणा करत आहेत.
-----------------------------
हवेतील प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशा बांधकामांवर कारवाईसाठी प्रहारने पत्रव्यवहार केला होता, परंतु कारवाईचे आदेश फक्त कागदावर असल्याने आता कायदेशीर लढाई लढणार आहोत.
- सुनील शिरीषकर, जिल्हा उपाध्यक्ष रायगड, प्रहार जनशक्ती पक्ष
--------------------------------------
पनवेल पालिकेतर्फे हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जे विकसक नियमांचे पालन करणार नाहीत. त्यांची बांधकामे थांबवण्याची कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकसकांवर प्रशासन स्तरावर लवकरच कारवाई केली जाईल.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
---------------------------------------
पालिकेची नियमावली
- बांधकाम प्रकल्पाभोवती किमान २५ फूट उंचीचे पत्रे लावावे.
- इमारतीभोवती हिरव्या रंगाच्या जाळीचे आच्छादन.
- बांधकामाच्या ठिकाणी सतत पाणी फवारणी.
- पाडलेले बांधकाम ताडपत्री, हिरव्या जाळीने झाकणे.
- भंगार साहित्यावर पाणी.
- रेडीमिक्स काँक्रीट पूर्णपणे झाकणे.
- बांधकाम ठिकाणांवर वायुप्रदूषण मॉनिटर्स.
- बांधकामाच्या क्षेत्रावर कचरा जाळू नये.
-------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com