अंबरनाथमध्ये कडाक्याची थंडी
अंबरनाथमध्ये कडाक्याची थंडी
तापमानात मोठी घसरण; नागरिक गारठले
अंबरनाथ, ता. १६ (वार्ताहर) : शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून अचानक कडाक्याची थंडी जाणवू लागली असून, तापमानात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. पहाटे लवकर आणि रात्री उशिरा जाणवणाऱ्या तीव्र थंडीमुळे नागरिक अक्षरशः कुडकुडत आहेत. या अचानक वाढलेल्या गारव्यामुळे रस्ते, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणची वर्दळही कमी झाल्याचे चित्र आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथ परिसरात पहाटेच्या सुमारास तापमान सरासरीपेक्षा बऱ्याच अंशांनी खाली आले असून, ते १२ ते १४ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या लाटेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. डिसेंबर महिना सुरू होण्यापूर्वीच इतका तीव्र गारवा जाणवणे ही एक अनोखी बाब मानली जात आहे.
शहरात थंडी वाढल्यामुळे सकाळी अनेक ठिकाणी नागरिकांनी घरासमोर शेकोट्या पेटवलेल्या दिसत आहेत. चहा-कॉफी केंद्रांवर मोठी गर्दी असून, नागरिक थंडीपासून बचावासाठी विशेषतः चहा-कॉफीसारख्या गरम पेयांना प्राधान्य देत आहेत. रिक्षाचालक आणि बांधकाम मजूर यांसारख्या बाहेरील कामगारांना या कडक थंडीमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
खबरदारीचे आवाहन
थंडीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना बसत आहे. त्यामुळे बी. जी. छाया रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. शुभांगी वाडेकर यांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या बदललेल्या हवामानामुळे घसा खवखवणे, सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे जाणवत आहेत. गरम कपडे वापरणे, थंडीत बाहेर जाणे टाळणे आणि गरम पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.
शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय
सकाळी लवकर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, पालकांकडून गरम कपड्यांची विशेष व्यवस्था केली जात आहे. मागील मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने अखेर विश्रांती घेतली असून, थंडीची सुरुवात झाल्याने हा गारवा सुखकारक वाटत असला तरी, आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस असाच गारवा राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

