टिळकनगरमध्ये मतदारांचा वेगळा कौल

टिळकनगरमध्ये मतदारांचा वेगळा कौल

Published on

टिळकनगरमध्ये मतदारांचा वेगळा कौल
स्थानिकच नगरसेवक हवा, उपरा नकोच
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ ः कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीची चाहूल लागताच डोंबिवलीतील टिळकनगर प्रभागात राजकीय असंतोषाला नवे वळण मिळू लागले आहे. एकेकाळी स्वच्छ, सुंदर, हिरवळीने नटलेला आणि राहणीमानाच्या निकषांवर आदर्श मानला जाणारा हा प्रभाग मागील काही वर्षांत दुरवस्थेला सामोरा गेला आहे. कचऱ्याचे ढीग, अनियंत्रित पार्किंग, गंडलेले रस्ते आणि हरवलेले देखणेपण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी यंदाच्या निवडणुकीत एक वेगळा आणि ठोस कौल दिला आहे ‘उपरा नको, टिळकनगरचा नगरसेवक टिळकनगरचाच हवा.’
प्रभागातील जाणते आणि रहिवासी या भूमिकेवर ठाम आहेत. स्थानिक नगसेवक प्रभागात राहतो, इथल्या समस्या अनुभवतो, नागरिकांशी रोजचा संपर्क राहतो आणि गरज पडली की तत्काळ धावून येतो; त्यामुळे समस्या सोडविण्याची प्रक्रिया अधिक तातडीने आणि प्रभावीपणे पार पडते, अशी भावना नागरिकांमध्ये स्पष्टपणे व्यक्त होत आहे. बाहेरून येणाऱ्या नगरसेवकांबाबतचा तिटकारा मागील दशकातील अनुभवावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. कारण बाहेरील प्रतिनिधी अनेकदा प्रभागात क्वचितच येतो, कार्यालयही प्रभागाबाहेरच असल्याने तक्रारी मांडण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. समस्यांची तीव्रता समजावून सांगताना वेळ जातो आणि विकासकामांमध्ये सातत्य राहात नाही, असा आरोप नागरिक वारंवार करताना दिसत आहेत.
चार सदस्य प्रभाग पद्धतीनंतर टिळकनगर प्रभाग दोन ते तीन भागांमध्ये विभागण्यात आला आहे. तरी मूळ टिळकनगरचा भाग अबाधितच राहिला आहे. या बदलामुळे नागरिकांमध्ये असलेली भीती कुठला तरी उपरा उमेदवार पुन्हा येईल काय? यंदा प्रथमच जाहीर आणि ठाम प्रतिकारामध्ये बदलली आहे. टिळकनगरमधील जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन निवडणुकीपूर्वीच स्थानिक उमेदवारासाठी जनजागृती सुरू केली आहे. चौकाचौकात, वसाहतींमध्ये आणि टिळकनगरच्या मुख्य मार्गांवर ‘स्थानिकच नगरसेवक हवा, उपरा नको’, ‘१० वर्षांचे पारतंत्र्य पुरे’ अशा संदेशांचे फलक झळकू लागले आहेत. हे फलक प्रभागात चांगलीच चर्चा रंगवत आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीत टिळकनगरमध्ये स्थानिकतेचा मुद्दा निर्णायक ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. मतदारांचा हा वेगळा आणि ठाम कौल प्रभागातील राजकीय समीकरणे बदलू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.

स्थानिक नवीन नेतृत्वाची मागणी
यापूर्वी टिळकनगरचे नेतृत्व सुरेश पिंगळे, मंगला सुळे आणि मनोज राजे यांसारख्या माजी स्थानिक प्रतिनिधींनी केले होते. त्यांच्या काळात प्रभाग प्रगत, स्वच्छ आणि व्यवस्थित असल्याची आजही अनेक रहिवासी आठवण करून देतात, परंतु मागील १० वर्षांत भाजपचे राजन आभाळे या बाहेरील उमेदवाराने प्रतिनिधित्व करताच प्रभाग विकासाच्या बाबतीत मागे पडल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली. या पार्श्वभूमीवरच यावर्षी नागरिकांनी कोणाच्याही दबावाशिवाय स्वतःहून पुढाकार घेतलेली ही चळवळ अधिक ठळकपणे दिसून येत आहे. यामुळे स्थानिक नवीन नेतृत्वाला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. अशा आशयाचे बॅनरदेखील नागरिकांनी प्रभागांमध्ये लावले आहेत.

चळवळ सुरू
टिळकनगरमधील काही जाणत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, यंदाच्या निवडणुकीत टिळकनगरचा उमेदवार टिळकनगरचाच असावा, हीच मोहीम हाती घेतली आहे. पक्ष कोणताही असो, प्रभागात समस्या ओळखणारा, लोकांमध्ये राहणारा आणि त्यांच्या हाकेला धावून येणारा स्थानिकच आमचा प्रतिनिधी असावा, अशी मतदारांची मागणी आहे. त्यानुसार प्रभागात घराघरांत संवाद, सोशल मीडियावर मोहीम आणि प्रत्यक्ष लोकसंपर्क सुरू असून, नागरिकही या चळवळीत सक्रियपणे सहभागी होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com