ठाण्यात पकडली ४२ लाखांची वीज चोरी
ठाण्यात पकडली ४२ लाखांची वीजचोरी
दोघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून रिमोट सर्किटच्या मदतीने मागील दोन वर्षांपासून तब्बल एक लाखाहून अधिक युनिटचा वापर करत, ४२ लाखांची वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांतील ही सर्वात मोठी वीजचोरी असल्याचे बोलले जात आहे. यापुढे अशी वीजचोरी आढळल्यास वीजचोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महावितरण कंपनीने दिला आहे.
कोलशेत येथील द रेकडी या हॉटेलच्या मीटर डेटामध्ये संशयास्पद अनियमितता दिसून आल्यामुळे संबंधित ग्राहकांचे मीटर तपासण्याचे आदेश मुख्य अभियंता संजय पाटील यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी (ता. ११) महावितरण कोलशेत उपविभागातील सहाय्यक अभियंता विठ्ठल माने व त्यांचे सहकारी फॉरमन किरण दंडवते व प्रधान तंत्रज्ञ राजेंद्र बने यांनी खवेरा सर्कल येथील हॉटेलच्या विद्युत मीटरची तपासणी केली असता, सीलमध्ये छेडछाड केल्याचे आढळून आले आणि मीटरमध्ये पल्सची नोंदसुद्धा होत नसल्याने सखोल तपासणी केली असता अनियमित वीज वापर होत असल्याचे दिसून आले. तेथे उपस्थित वीजग्राहक शिवराम शेट्टी व वीज वापरकर्ता शैलेश डेढिया यांना दाखवून मीटर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी, ग्राहक प्रतिनिधींसमोर मीटरची तपासणी केल्यावर मीटरमध्ये वीज वापर कमी दाखवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रिमोट सर्किट लावल्याचे निदर्शनास आले. ते रिमोट सर्किट वीजचोरी करण्यासाठी लावल्याचे ग्राहक प्रतिनिधी यांनी कबूल केले. मीटरची तपासणी केली असता मीटरमधून गेल्या दोन वर्षांपासून एक लाख १० हजार ३९३ युनिटची एकूण ४१ लाख ६६ हजार ७१० वीजचोरी केल्यामुळे शिवराम शेट्टी व शैलेश डेढिया यांच्यावर विद्युत कायद्यान्वये कोपरी पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वीजचोरी हा एक फौजदारी गुन्हा असून ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा वापर करावा. अनधिकृत वीज वापरल्यास याचा भार प्रामाणिक ग्राहकांवर पडतो. महावितरणची वीजचोरांविरुद्ध मोहीम सुरूच राहणार आहे व यापुढे अशी वीजचोरी आढळल्यास वीजचोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

