उल्हासनगरात पुन्हा सायबर ठगांचा सापळा
उल्हासनगरमध्ये सायबर ठगांचा नवा सापळा
खोट्या ट्रेडिंग ॲपद्वारे वृद्धाला २८ लाखांचा गंडा
उल्हासनगर, ता. १७ (बातमीदार) : शेअर बाजारात जास्त परतावा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून उल्हासनगरमधील एका वृद्ध नागरिकाची तब्बल २८.०५ लाखांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजमाध्यमांवरील जाहिराती आणि बनावट व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करून ठगांनी हा मोठा घोटाळा केला आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३, सी-ब्लॉक परिसरातील इंदर खानचंदानी यांना समाजमाध्यमावर एका आकर्षक ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची जाहिरात दिसली. ‘कमी गुंतवणुकीत मोठा नफा’ देण्याचे प्रलोभन दाखवत त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये दररोजच्या ‘कमाईचे स्क्रीनशॉट्स’, ‘तज्ज्ञांचे मार्गदर्शन’ आणि ‘प्रीमियम सिग्नल्स’चा वापर करून सायबर गुन्हेगारांनी त्यांचा विश्वास संपादन केला.
फसवणुकीची पद्धत
२१ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत वृद्ध नागरिकाला विविध बँक खात्यांमध्ये हप्त्यांमध्ये २८ लाख पाच हजार हस्तांतरित करण्यास भाग पाडण्यात आले. सुरुवातीला ‘गुंतवणूक वाढली आहे’, ‘तुमचा नफा तयार आहे’ असे सांगून पैसे भरण्यास प्रोत्साहित केले; मात्र जेव्हा खानचंदानी यांनी आपला नफा परत मागितला, तेव्हा ठगांनी प्रतिसाद देणे बंद केले आणि संबंधित वेबसाईटही अचानक बंद झाली. या फसवणुकीची स्पष्ट कल्पना आल्यानंतर इंदर खानचंदानी यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपाली वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नागरिकांना आवाहन
सायबर पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही ‘उच्च परताव्या’च्या प्रलोभनाने होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहावी आणि अनोळखी व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर विश्वास ठेवू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

