ग्रामीण भागातील बैलगाडी संस्कृती उंबरणीवर
महेश भोये : सकाळ वृत्तसेवा
तलासरी, ता. १८ : ग्रामीण भागात दळणवळणाचे प्रमुख साधन असलेली बैलगाडी आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या व्यवसायावर पोट चालवणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे पिकअप, टेम्पो, लहान मालवाहू गाड्या गावागावात पोहोचू लागल्या आहेत. परिणामी गवत-पावली वाहतुकीसाठी बैलगाडीची गरज अत्यल्प झाली आहे. ग्रामीण अर्थचक्रातील एक पारंपरिक व्यवसायच मोडीत निघत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
डिसेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी बैलगाडीचालकांसाठी कमाईचा हंगाम मानला जायचा. या काळात त्यांची कमाई ही ३० ते ५० हजार असायची. हंगामी काळात कोचाई बोरमाळ, सूत्रकार, वडोली, उधवा अशा अनेक गावांतील बैलगाडीचालक पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी स्थलांतरित व्हायचे, पाच वर्षांपूर्वी एका बैलगाडीचालकाला हंगामात सुमारे ४० ते ५० भाडी मिळायची.
पूर्वी गावोगावी बैलगाडी हेच वाहतुकीचे प्रमुख साधन होते. घरगुती कामे, शेतीकाम, भातकापणी-झोडणीतील पेंडा, पावली, गवत वाहतूक या सर्वांसाठी बैलगाडीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. पूर्वी मर्यादित पण स्थिर उत्पन्नावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत होता; मात्र आता लहान वाहनांचा गावांत शिरकाव झाला असून, गवत, पावलीची वाहतूक जवळपास पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे बैलगाडी चालकांना कुणी काम देत नाही, अशी स्थिती झाली आहे. या परंपरेसोबत जगणाऱ्या शेकडो आदिवासी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
बैलगाडीचालक चिंतेच्या गर्तेत
दरवर्षी दिवाळीनंतर पालघर जिल्हा परिसरात २० ते ३० बैलगाडीचालक स्थलांतरित होत. तेथे दोन महिने मुक्काम ठोकून गवत, पावली वाहतूक करीत. आता शहरापासून गावकुसापर्यंत लहान ट्रान्स्पोर्ट वाहनांचे जाळे वाढल्याने या पारंपरिक वाहतुकीला पूर्णविराम मिळाला आहे. गावोगावी बैलगाडीचे चाक मोकळे पडू लागले असून, चालक कामाच्या प्रतीक्षेत बैलांनी बांधलेल्या गाडीजवळ बसून राहतात.
संस्कृतीचे प्रतीकही संपण्याच्या मार्गावर
पूर्वी गावातील लग्नसमारंभ, वऱ्हाडाची मिरवणूक, शेतीची कामे, मालवाहतूक अशा सर्वांसाठी बैलगाडीचा वापर होत असे. आता आधुनिक वाहने आल्याने ही परंपरा जवळजवळ संपुष्टात आली आहे. बैलगाडी केवळ इतिहासातील प्रतीक बनण्याची शक्यता आहे.
अनेक वर्षांपासून आम्ही दिवाळीनंतर दोन महिने बैलगाडी हाकून उदरनिर्वाह करीत होतो. पालघर जिल्ह्यात २० ते ३० बैलगाडी चालक मिळून बिऱ्हाड बांधून गवत, पावली वाहतूक करीत असू. पण आता गावोगावी पिकअप व टेम्पो आल्याने आमचा रोजगारच संपला आहे. आमच्यावर शब्दशः उपासमारीचे दिवस आले आहेत.
- ऋणीत रावते, बैलगाडीचालक
एका फेरीमागे मिळकत : ३५० ते ४००
दिवसातील फेऱ्या : दोन ते तीन
दिवसाची कमाई : १,००० ते १,२००
हंगामातील कमाई : ३०,००० ते ५०,०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

