डोंबिवली कल्याणचा राजकीय पट बदलतोय
कल्याण-डोंबिवलीचा राजकीय पट बदलतोय
वैर संपतंय, हितगुज वाढतेय, नवी समीकरणं जुळतायत
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ ः कल्याण-डोंबिवलीचा राजकीय पट सध्या एका रंजक वळणावर आहे. राजकारणात कोणी कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो ही जुनी म्हण येथे खरी ठरताना दिसते. काही ठिकाणी नवी मैत्री फुलताना दिसत आहे. तर, काही जुनी मैत्रीला तडे जाऊन दुरावा निर्माण होताना दिसत आहे.
डोंबिवली पश्चिमचे ज्येष्ठ नेते पुंडलिक म्हात्रे आणि कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यात एकेकाळी राजकीय वैर होते. कुटुंबांच्या पिढ्यापिढ्यांच्या संघर्षाचा वारसा दोन्ही घराण्यांच्या राजकारणात होता. पण, आता राजकीय गणित बदलत असून दृष्टीकोनही बदलत आहे. अलीकडेच शिवसेना सोडून दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर ते भाजपच्या विविध कार्यक्रमांत सातत्याने उपस्थित राहू लागले आहेत. कल्याण पूर्वेतील एका सोहळ्याप्रसंगी दीपेश म्हात्रे आणि गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड एकत्र दिसून आले होते. यामुळे कट्टर शत्रू असलेल्या दोन घराण्यांची पुढची पिढी एकत्र येतेय का, असा प्रश्न आपसूकच उपस्थितांच्या मनात आला.
तर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि दीपेश म्हात्रे यांचे नाते अनेक वर्षांपासून राजकीय तणावाने व्यापलेले होते. विकासकामांपासून पक्षातील अंतर्गत राजकारणापर्यंत दोघेही अनेकदा परस्परविरोधी उभे असल्याचे चित्र मतदारसंघात पाहायला मिळायचे. परंतु, शिवसेनेतून अपेक्षित राजकीय प्रगती न होताच आणि सत्तेच्या केंद्रापासून दूर जाताना आपली क्षमता मर्यादित होत असल्याची जाणीव झाल्याने म्हात्रे अखेर भाजपकडे झुकले. महापौर आणि आमदारकीपर्यंतची स्पष्ट आश्वासनांचे दरवाजे त्यांच्या स्वागतासाठी उघडे करण्यात आले.
राजकीय समीकरणांचे हेच कोडे आता मनसे-शिंदे गटातही दिसत आहेत. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील आणि शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातील मतभेद सर्वपरिचित आहे. विविध कार्यक्रमांत आपापसातील मतभेद त्यांच्या वक्तव्यातून उघडपणे जाहीर झाली आहेत. यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी करत दोघांचेही कान टोचले होते.
पण, लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार न देता महायुतीला पाठिंबा दिला आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचा मान राखत राजू पाटील यांनीही शिंदे यांच्या प्रचारात आगेकूच केली. परिणामी शिंदे यांचा विजय झाला. एकेकाळचे कट्टर विरोधक प्रथमच एकत्र दिसले. मात्र, विधानसभा निवडणुकीत पुन्हा समीकरणं कोलमडली आणि शिवसेनेने पाटील यांच्याविरोधात राजेश मोरे यांना उमेदवारी दिल्याने शीतयुद्ध पुन्हा चिघळले.
पण, राजकारण म्हणजे बदलणारे पाणीच. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात राजू पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे आणि महेश गायकवाड एकत्र हितगुज करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात उळट-सुलट चर्चांना उधाण आले. यामुळे शिंदे-मनसे समीकरण पुन्हा जुळतेय? महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांत समन्वयाची नवी वाट निघतेय का? याविषयी अटकळ बांधली जात आहे.
एकूणच डोंबिवली–कल्याणचा राजकीय पट वरकरणी शांत दिसत असला तरी त्याखाली सतत नवीन हालचाली सुरू आहेत. जे काल विरोधात होते ते आज एकत्र येत आहेत, आणि जे काल एकत्र होते ते आज दुरावले आहेत. या बदलत्या नातेसंबंधांनी एकच गोष्ट पुन्हा सिद्ध केली की सत्ता, परिस्थिती आणि संधी... हेच आजचं खरं समीकरण.
फडणवीसांचा पुढाकार
नुकताच रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. परंतु, रवींद्र चव्हाण आणि दीपेश म्हात्रे यांचे नाते सर्वज्ञात आहे. विकासकामांपासून राजकारणापर्यंत दोघेही अनेकदा विरोधात उभे होते. परंतु, शिवसेनेतून अपेक्षित राजकीय प्रगती न होताच म्हात्रे अखेर भाजपकडे झुकले. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला मजबूत करण्यासाठी चव्हाण-म्हात्रे यांचे समीकरण बसविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते.
पालिका निवडणुकीत नवं समीकरण?
राजू पाटील आणि शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातही नाते कटूतेचेच. विविध कार्यक्रमांत आपापसातील मतभेद त्यांच्या वक्तव्यातून उघडपणे जाहीर झाली आहेत. पण, काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात राजू पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे आणि महेश गायकवाड एकत्र हितगुज करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात उळट-सुलट चर्चांना उधाण आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

