वाहतुकीचा ‘कल्लोळ’

वाहतुकीचा ‘कल्लोळ’

Published on

वाहतुकीचा ‘कल्लोळ’
नवी मुंबईत सीएनजीचा पुरवठा बंद
तूर्भे, ता. १७ (बातमीदार) : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे नवी मुंबईला होणारा नैसर्गिक वायू (सीएनजी)चा पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे सकाळपासून शहरातील खासगी, प्रवासी वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने दिवसभर कल्लोळ निर्माण झाला होता.
नवी मुंबई शहरामध्ये २५ हून अधिक सीएनजी पंप आहेत. त्यातील तीन पंप २४ तास खुले राहतात. तुर्भे एनएमएमटी बस आगाराशेजारी असणारा, तर दुसरा रबाळे, तर तिसरा कामोठे या ठिकाणी आहे. या पंपावर परिसरातील २५ हजारांहून अधिक रिक्षा चालवल्या जातात, तर दीड लाखांहून अधिक इतर वाहने इंधनासाठी येत असतात, पण रविवारी (ता. १६) दुपारपासून नवी मुंबईचा सीएनजी वायूचा पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी, त्याचे पडसाद वाहतूक व्यवस्थेवर झाल्याचे दिसून आले. ऐरोली ते पनवेलपर्यंत सर्वच प्रमुख पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.
--------------------
प्रवासी वाहतूक ठप्प
वाशी, नेरूळ, बेलापूर, घणसोली, ऐरोली, तुर्भे, पनवेल येथील पंपांवर मध्यरात्रीपासून वाहनांची गर्दी झाली आहे. त्यामुळे दिवसभर प्रवासी वाहने रस्त्यावर नसल्याने नोकरदारवर्गाला मोठा फटका बसला. त्याचा परिणाम दैनंदिन वाहतुकीवर निर्भर असलेल्या हजारो वाहनचालकांच्या उपजीविकेवर झाला. त्यामुळे वर्दळीच्या वेळेतच प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
------------------------------
भाडेवाढीचा फटका
रिक्षा, टॅक्सी सेवा प्रभावित झाली होती. सीएनजीअभावी टॅक्सी, रिक्षाचालकांनी लांबचे भाडे नाकारले. नवी मुंबईतील प्रत्येक रिक्षा, टॅक्सीमध्ये सीएनजीचा पुरवठा होण्यास प्रचंड विलंब होत असल्याने पंपाबाहेर लांबच लांब रांगांमुळे वाहतूक कोंडी होती. प्रवाशांना रिक्षा अभावी बस किंवा रेल्वेचा आधार घ्यावा लागला. खासगी वाहनांना गॅस संपल्याने इंधनासाठी धावपळ करावी लागली.
-----------------
विद्यार्थ्यांची गैरसोय
नवी मुंबई तसेच पनवेल परिसरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक रिक्षांमधून केली जाते. सीएनजी नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक विस्कळित झाली होती. त्यामुळे पालकांना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी धावपळ करावी लागली.
--------------------------
सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षामुळे खूपच त्रास सहन करावा लागला. रिक्षात कमी सीएनजी असल्याने रिक्षाचालक लांबचे भाडे नाकारत आहेत. त्यामुळे बस किंवा ट्रेनचा आधार घ्यावा लागत आहे.
- रणजित सोनवणे, प्रवासी
़़़़़ः-----------------------------
रविवारी दुपारपासून सीएनजी गॅससाठी अनेक पेट्रोलपंपावर गॅस उपलब्ध नसल्याने वाहने कशी चालवायची, असा प्रश्न आमच्या आहे. त्यात सीएनजीचालकांकडून पुरवठा सुरळीत होईल, याबाबत काही माहिती दिली जात नाही.
- सूर्यकांत मोरे, रिक्षाचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com