नव्या स्‍थानकांचा उद्‌घाटन लांबला!

नव्या स्‍थानकांचा उद्‌घाटन लांबला!

Published on

नव्या स्‍थानकांचे उद्‌घाटन लांबले!
आचारसंहितेचा फटका; उरणवासीयांचा हिरमोड
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : उरण मार्गावरील प्रवाशांना दिलासा देणाऱ्या १० वाढीव लोकल फेऱ्या आणि तरघर व गव्हाण या दोन नवीन स्थानकांच्या उद्‌घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाला आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने रेल्वे प्रशासनाला पुढील कोणतीही अंमलबजावणी करता येणार नाही, अशी स्पष्ट अडचण उभी राहिली आहे. वाढती प्रवासीसंख्या आणि दीड-दोन तासांनी मिळणाऱ्या लोकलमुळे त्रस्त असलेल्या उरणकरांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सीवूड्स-बेलापूर-उरण मार्गावर मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांच्या तुलनेत फेऱ्या खूपच मर्यादित आहेत. उरण मार्गावर दीड तासांच्या अंतराने लोकल मिळत असल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. वाढती गर्दी आणि मर्यादित फेऱ्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाय म्हणून पाच अप आणि पाच डाऊन अशा १० नवीन फेऱ्यांचे नियोजन पूर्ण झाले होते. विद्यमान ४० फेऱ्यांची संख्या ५० वर जाणार होती. मात्र आचारसंहितेमुळे संपूर्ण प्रस्ताव कागदावरच अडकला आहे.
तरघर आणि गव्हाण स्थानकांची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहेत. सिडकोने दोन्ही ठिकाणी आधुनिक सुविधा उभारल्या आहेत. विशेषतः तरघर स्थानक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वात जवळ असल्याने ते प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार होते. सुमारे दोन लाख चौरस फूट क्षेत्रावर बांधलेले हे स्थानक पाच प्लॅटफॉर्म, ७३० कार पार्किंग, बस आणि रिक्षांसाठी स्वतंत्र मार्ग तसेच कोस्टल मेट्रो आणि स्कायट्रेन जोडणीसह उभारण्यात आले आहे.
गव्हाण स्थानकात प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृह, तिकीटघर, पार्किंग यांसारख्या सुविधा तयार आहेत. काही किरकोळ कामे सुरू असूनही रेल्वेच्या निर्णय घेण्यावर आचारसंहितेची बंधने लागू झाल्याने उद्‌घाटन पुढे ढकलले आहे. त्यामुळे दोन्ही स्थानकांचे दरवाजे आता निवडणुकांनंतरच उघडणार आहेत.

दैनंदिन प्रवासात वाढलेला ताण
उरणवासीयांच्या दैनंदिन प्रवासावर या विलंबाचा थेट परिणाम होत आहे. दीड-दोन तासांनी मिळणाऱ्या लोकल, वाढती गर्दी आणि विलंब यांमुळे दररोज त्रास वाढत आहे. वाढीव फेऱ्या सुरू झाल्या असत्या तर दोन फेऱ्यांमधील अंतर कमी होऊन प्रवाशांच्या प्रवासात मोठा दिलासा मिळाला असता. पण आचारसंहितेमुळे आता फेऱ्या कधी सुरू होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

रेल्वेची तयारी पूर्ण
रेल्वे सूत्रांच्या मते, उरण मार्गावर १० अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्याची आणि दोन नव्या स्थानकांचे उद्‌घाटन करण्याची तयारी मध्य रेल्वेने पूर्ण केली होती. कामे, मनुष्यबळ, चाचण्या आणि सुरक्षा पडताळणीही बहुतेक पूर्ण झाल्या होत्या. प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी नियोजन जलद गतीने करण्यात आले. मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही नवीन सेवांचा विस्तार, स्थानकांचे उद्‌घाटन किंवा अतिरिक्त फेऱ्या सुरू करणे नियमांनुसार शक्य नाही. त्यामुळे उरणवासीयांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

५० फेऱ्या होणार
१० वाढीव लोकल फेऱ्या प्रस्‍तावित आहेत. सध्या एकूण ४० लोकल फेऱ्या सुरू आहेत. वाढ झाल्‍यानंतर लोकलच्या फेऱ्यांची संख्या ५० पर्यंत जाणार आहे. आचारसंहितेमुळे सर्व अंमलबजावणी थांबली आहे. सध्या प्रवाशांना दीड ते दोन तासांनी लोकल मिळत आहे.

तरघर, गव्हाण रेल्‍वेस्‍थानकांचे उद्‌घाटन थांबले!
१. तरघर स्टेशन (तयारी पूर्ण)
- नवी मुंबई विमानतळाजवळ
- २ लाख चौरस फुट क्षेत्रफळ
- ५ प्लॅटफॉर्म
- ७३० कार पार्किंग
- बस-रिक्षा वेगळे मार्ग
- कोस्टल मेट्रो आणि स्कायट्रेन कनेक्टिव्हिटी योजना

२. गव्हाण स्टेशन (तयारी जवळपास पूर्ण)
- प्लॅटफॉर्म, तिकीटघर, शौचालय तयार
- काही किरकोळ कामे सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com