उल्हासनगर महापालिकेचे आरक्षण जाहीर

उल्हासनगर महापालिकेचे आरक्षण जाहीर

Published on

उल्हासनगर महापालिकेचे आरक्षण जाहीर
आजपासून हरकतींसाठी संधी
उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या राजकीय रणसंग्रामाला सुरुवात झाली असून, २०२५च्या महापालिका निवडणुकीतील ‘प्रभागनिहाय प्रारूप आरक्षण’ जाहीर झाले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि नागरिकांचे लक्ष आता आरक्षणावर दाखल होणाऱ्या हरकतींकडे खिळले आहे. उल्हासनगर महापालिकेने जाहीर केलेल्या सूचनेनुसार सोमवार (ता. १७) ते २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.

उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झाली असून, प्रभागनिहाय प्रारूप आरक्षणाची अधिकृत प्रसिद्धी करण्यात आली आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गांत येणारे प्रभाग जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. उल्हासनगर महापालिका मुख्यालय, सूचना फलक तसेच संबंधित प्रभाग समिती कार्यालयांत प्रारूप आरक्षण ठेवले असून नागरिक, इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांकडून अपेक्षित असलेला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. यापूर्वी ८ नोव्हेंबरला जारी केलेल्या सूचनेनुसार, या प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

१७ ते २४ नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत संबंधितांनी आपापल्या हरकती किंवा सूचना महापालिका मुख्यालयातील निवडणूक कार्यालयात किंवा संबंधित प्रभाग समिती कार्यालयात प्रत्यक्ष जमा कराव्यात, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन, ई-मेल किंवा महापालिका संकेतस्थळावरून प्राप्त होणाऱ्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या सहीने जारी झालेल्या या अधिसूचनेमुळे निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. प्रारूप आरक्षणातील बदल, शक्यता आणि त्यावर दाखल होणाऱ्या हरकती यावरच शहरातील राजकीय वातावरण सध्या केंद्रित झाले आहे. उल्हासनगरमध्ये २०२५ची निवडणूक अधिक रंगतदार होणार, हे आता उघडपणे दिसू लागले आहे.
..................................

Marathi News Esakal
www.esakal.com