एमआयडीसी निवासी मध्ये पुन्हा पाण्याचा तुडवडा
एमआयडीसीमध्ये पाण्याचा पुन्हा तुडवडा
नागरिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर संतापले
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : डोंबिवली एमआयडीसी निवासी भागामध्ये काही दिवसांपासून पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. याविषयी एका ज्येष्ठ नागरिकाने आठवडाभरापूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात धाव घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले असता पाणी सोडण्यात आले होते, परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली असून, पाण्याचा तुटवडा झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
एमआयडीसी निवासी आणि आजूबाजूचा ग्रामीण परिसरातील पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे. याप्रकरणी एका वृद्धाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर स्थानिक आमदार, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सर्व नागरिकांनी ७ नोव्हेंबर रोजी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवसापासून पाणीपुरवठा जास्त दाबाने येण्यास सुरुवात झाल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला होता, मात्र आता मागील चार दिवसांपासून पुन्हा पाण्याचा दाब कमी झाला असून, कोणत्याही वेळेत येत असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत याचा जाब उमेदवार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना विचारणार असल्याचा निर्धारही बोलून दाखवला. त्यामुळे येणाऱ्या ऐन निवडणुकीत पाणीप्रश्न पेटणार हे दिसत आहे.
एमआयडीसी निवासी-सुदामानगरमधील नवसंकुल सोसायटीमधील रहिवाशांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने तेथील रहिवासी सुदेश बेर्डे यांनी उद्विग्न होऊन चीड व्यक्त केली. यंदा पाऊस चांगला पडला असून, धरणातही भरपूर पाणी आहे. तरी आम्हाला पाणी प्रशासन का देऊ शकत नाही याचे उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मिलापनगरमधील रहिवासी राजीव देशपांडे यांनीही संताप व्यक्त करत एमआयडीसी आणि राजकारण्यांना यासाठी दोष दिला आहे. निवासी भागात पाण्याबरोबर गटारी/नाले, स्वच्छता, भूमिगत सांडपाणी वाहिन्या, धोकदायक इमारती/पुनर्विकास, वीजपुरवठा आदी प्रश्न, तक्रारी आहेत. त्यांचाही निपटारा लवकरच झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पाण्यासाठी वरिष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न
पाणीप्रश्नी गुरुवारी (ता. ७) ज्येष्ठ नागरिक काशिनाथ सोनावणे यांनी (वय ७६) जय गुरुदेव सोसायटी इमारतीच्या गच्चीवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याचवेळी त्याच सोसायटीत राहणारे अनिल शिंदे यांनी त्यांची समजूत काढून त्यांना घरी सोडले. वकील मुकुंद वैद्य यांनी आणि रहिवाशांनी उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच एमआयडीसी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल करून निवासी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती, परंतु अद्यापही पाणीप्रश्न जैसे थेच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

