गॅस तुटवड्याने रिक्षा चालकांचे कोटींचे नुकसान

गॅस तुटवड्याने रिक्षा चालकांचे कोटींचे नुकसान

Published on

गॅस तुटवड्याने रिक्षाचालकांचे कोट्यवधींचे नुकसान
प्रवाशांचेही हाल; पंपांवर दोन किलोमीटरपर्यंत रांगा
ठाणे शहर, ता. १७ (बातमीदार) : शहरात गेल्या दीड दिवसापासून सीएनजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी सेवांवर थेट परिणाम झाला आहे. ५० टक्क्यांहून अधिक रिक्षा गॅसअभावी बंद राहिल्याने रिक्षाचालकांना सुमारे १० कोटींचे मोठे नुकसान झाले असून, नोकरदार प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

पन्नास टक्क्यांहून अधिक रिक्षा उभ्या असल्याने ठाणे स्टेशन परिसरात रिक्षा मिळेनाशा झाल्या. सोमवारी (ता. १७) कामाचा दिवस असल्याने नोकरदारवर्गाला कामावर जाण्यासाठी आणि घरी येण्यासाठी रिक्षा मिळवण्यासाठी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. ठाणे स्थानक परिसरात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संकटसमयी काही रिक्षाचालकांनी गॅसऐवजी पेट्रोल भरून रिक्षा चालवल्या. पेट्रोल आणि गॅसच्या किमतीतील फरकामुळे त्यांनी रोजच्या भाड्यापेक्षा १० रुपये ज्यादा आकारले. यामुळे काही ठिकाणी प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद झाले. सीएनजी टंचाई दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्याने दुपारी वागळे इस्टेट परिसरातील काही पंपांवर गॅसपुरवठा सुरू होताच रिक्षाचालकांनी गॅस भरण्यासाठी पंपांवर दीड ते दोन किलोमीटर लांब रांगा लावल्या होत्या.

एसटीलाही फटका
घोडबंदर मार्गावरील सीएनजी पंपांवर ओला, उबेरसारख्या टॅक्सीचालकांनीही रांगा लावल्या होत्या. खोपट येथील पंपावर गॅसअभावी सीएनजीवर चालणाऱ्या अनेक एसटी बसेस आगारात उभ्या कराव्या लागल्या.

आर्थिक नुकसान
ठाण्यात सुमारे ५० हजारांहून अधिक रिक्षा धावतात. प्रत्येक रिक्षाचे दिवसाचे सरासरी उत्पन्न १,००० ते १,५०० असते. दोन दिवसांत ५० टक्क्यांहून अधिक रिक्षा बंद राहिल्याने रिक्षाचालकांचे अंदाजे १० कोटींचे मोठे नुकसान झाले आहे. प्रहार जनशक्ती रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी सांगितले, की काही रिक्षाचालकांनी पेट्रोलवर रिक्षा चालवून ना नफा ना तोटा या तत्त्वावर सेवा दिली. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक ठिकाणी प्रवाशांना प्राधान्य देण्याच्या सूचना रिक्षाचालकांना देण्यात आल्या होत्या.

Marathi News Esakal
www.esakal.com