अंबरनाथमध्ये उमेदवारांची दाणादाण

अंबरनाथमध्ये उमेदवारांची दाणादाण

Published on

अंबरनाथमध्ये उमेदवारांची दाणादाण
अर्ज दाखल करण्यासाठी रांगा; नगराध्यक्षपदासाठी शक्तिप्रदर्शन
अंबरनाथ, ता. १७ (बातमीदार) : ढोल-ताशांचा गजर, भव्य बाइक रॅली, नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांची रथयात्रा अशा अभूतपूर्व वातावरणात अंबरनाथमध्ये शक्तिप्रदर्शन करत उमेदवारांनी सोमवारी (ता. १७) आपला अर्ज दाखल केला; मात्र एबी फॉर्म मिळवण्यापासून ते अर्ज दाखल करेपर्यंत नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या उमेदवारांची उडालेली तारांबळ आणि नंतर लागलेल्या रांगांनी नगर परिषद आवार गजबजून गेले. गर्दीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची आणि वेळेची बचत करत अर्ज भरून घेताना प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली.

अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची आज सोमवारी अंतिम मुदत होती. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी नगरपालिका कार्यालय आणि परिसरात अभूतपूर्व गर्दी झाली होती. सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज घेण्यास सुरुवात करण्यात आली. महायुती आणि महाविकास आघाडी फिस्कटल्यामुळे आयत्यावेळी अनेक उमेदवारांच्या हाती पक्षाचा एबी फॉर्म आला. भाजपसह शिवसेना शिंदे गटातर्फे इच्छुक उमेदवारांना आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देण्यात आल्याने वेळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना रांगेत उभे राहावे लागले होते. एबी फॉर्म मिळेपर्यंत इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी कार्यालयात रांगा लावण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसले. पक्षाकडून अधिकृत अर्ज न मिळाल्याने काही इच्छुकांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. आज होणाऱ्या गर्दीचा अंदाज आल्याने नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून उमेदवार आणि त्यांच्या सूचक, अनुमोदक यांनाच सोडण्यात येत होते. शिवसेना शिंदे गटातर्फे नगराध्यक्षापदासाठी माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनीही शक्तिप्रदर्शन नकरत उमेदवारी अर्ज सादर केला. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टोकण देउन अर्ज दाखल
दुपारी २ वाजून ५६ मिनिटांनी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपणार होती; मात्र उमेदवारांची लागलेली भली मोठी रांग पाहता मुदतीत अर्ज स्वीकारणे प्रशासनाला शक्य होणार नव्हते. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत रांगेत असलेल्या उमेदवार, सुचक, अनुमोदक यांना टोकण देण्यात आले. त्यानंतर उशिरापर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रीया प्रशासनाकडून सुरू होती. याच पद्धतीने रविवारीही अर्ज दाखल करण्यात आले होते.

अंबरनाथ दुमदुमले
एकीकडे कार्यालयात वाढती रांग, तर दुसरीकडे शक्तिप्रदर्शनाने शहर दुमदुमून गेल्याचे दिसले. नगराध्यक्षा पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना आणि भाजपतर्फे ढोल-टाशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. भारतीय जनता पक्षातर्फे तेजश्री करंजुले-पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला. माजी आमदार नरेंद्र पाटील, कल्याण जिल्ह्याचे नरेंद्र सूर्यवंशी, भाजपचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले-पाटील, यांच्यासह जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले-पाटील यांच्यासह इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्षपदाचा अर्ज सादर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे अश्विनी पाटील यांनी तर काँग्रेस पक्षातर्फे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पत्नी नूतन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गट यांच्या वतीने माजी उपनगराध्यक्षा अंजली राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्या वेळी ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या उपस्थितीत अंजली राऊत यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज सादर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com