बाळासाहेब ठाकरे हाच एकमेव ब्रँड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बाळासाहेब ठाकरे हाच एकमेव ब्रँड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Published on

‘बाळासाहेब ठाकरे हाच एकमेव ब्रँड’
कला दालनाच्या उद्‍घाटनप्रसंगी शिंदेंचे प्रतिपादन

भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मिरा भाईंदर महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (ता. १६) करण्यात आले. ‘बाळासाहेबांचे नाव घेऊन बरेच लोक स्टँड घेत आहेत, काही लोक त्यांना ब्रँड म्हणत आहेत. मात्र ब्रँड एकच आहे तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाकीचे जे बोलत आहेत त्यांचा बँड महाराष्ट्रातील जनता नक्कीच वाजवेल आणि त्यांना शेवटच्या स्टँडमध्ये पोहोचविल्याशिवाय रहाणार नाही. या ठिकाणी फेसबुक लाइव्ह नाही तर फेस टू फेसची आवश्यकता आहे,’ अशी खरमरीत टीका लोकार्पण करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
बाळासाहेबांचा विचार घेऊनच आपण पुढे जात आहोत, म्हणूनच महाराष्ट्राने आपल्याला स्वीकारले. बाळासाहेब नेहमी म्हणायचे शब्द देताना शंभरवेळा विचार करा; मात्र एकदा शब्द दिला की माघार नाही. कार्यकर्त्याने घरात नाही तर लोकांच्या दारात असावे, असे बाळासाहेब सांगायचे. मुंबईत मराठी माणसाला ताठ मानेने जगता यावे, यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. शिवसेनेचे नाव देशभरात, जगभरात पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. सहकाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना वाढविण्याची संधी आपल्याला मिळाली याचा सार्थ अभिमान आहे. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे बाळासाहेबांनी सांगितले होते. जेव्हा हे घडले तेव्हा आम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना व धनुष्यबाण सोडवला आणि राज्यात सर्वसामान्यांचे राज्य आणले. मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री झालो यामागे बाळासाहेबांचे आशीर्वाद व आनंद दिघे यांची शिकवण आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी सांगितले.


शिवसेनेत शिवसैनिक हे पद सर्वात महत्त्वाचे आहे, असे बाळासाहेब सांगायचे. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे. त्यांना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, अशी टीकाही शिंदे यांनी या वेळी केली. बाळासाहेब आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत आणि ते विचार आपल्याला प्रेरणा देत राहतील. बाळासाहेब म्हणजे आपला श्वास, आपले प्रेम आहे. हिंदुत्वाची शान, स्वाभिमान बाळासाहेबांनी जपला. तोच आपल्याला जपायचा आहे, वाढवायचा व पुढे न्यायचा आहे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी या वेळी केले.

बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित विशेष दालन
बाळ ठाकरे ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा दालनात जिवंत होतो. दादरच्या खांडके बिल्डिंगपासून मातोश्रीमधील बाळासाहेबांची खोली आणि शिवसेना भवनच्या आठवणीपर्यंत सर्व काही हुबेहूब प्रतिरूपात उभारले आहे. या ठिकाणी नागरिकांना बाळासाहेब ठाकरे यांची जुनी भाषणे एकता येतील, त्यांच्यासोबत एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फोटो काढता येणार आहेत.
.........................................
कलादालन पाहताना साक्षात शिवसेनाप्रमुख समोर उभे असल्याचा भास झाला. नव्या तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना येथे पाहायला मिळाला. आतापर्यंत उभारलेल्या सर्व प्रकल्पांतील हा सर्वात उत्तम प्रकल्प असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. बाळासाहेबांचे जिवंत स्मारक त्यांनी या ठिकाणी उभे केले आहे. येथे येणारे बाळासाहेबांचे विचार ऐकून नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जातील.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com