सीएनजी तुटवड्याने वाहतूक विस्कळित

सीएनजी तुटवड्याने वाहतूक विस्कळित

Published on

सीएनजी तुटवड्यामुळे वाहतूक विस्कळित

रिक्षा, टॅक्सी, शालेय बस आणि बेस्टची सेवा काेलमडली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : शहरातील सीएनजीचा पुरवठा खंडित झाल्याने सोमवारी सार्वजनिक वाहतूक अक्षरशः कोलमडून पडली. रिक्षा, टॅक्सी, शालेय बस आणि बेस्ट बस रस्त्यावर उतरू न शकल्यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि रुग्णांचे प्रचंड हाल झाले. त्याचप्रमाणे अनेक चालकांचे दिवसभराचे उत्पन्नही बुडाले. मंगळवारी सकाळपासून सीएनजीचा पुरवठा सुरू हाेण्याची प्राथमिक माहिती असली तरी हा पुरवठा कमी दाबाने हाेणार असल्याने वाहतूक अडखळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रॉम्बे येथील आरसीएफ परिसरात गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनमधून गळती झाल्याने वडाळा सिटी गेट स्टेशनवरील पुरवठा रविवारीच विस्कळित झाला. त्यानंतर सोमवारी दिवसभर सीएनजीचा पुरवठा बंद राहिला. त्याचे गंभीर परिणाम सकाळपासून दिसू लागले. सोमवारी एमजीएलच्या ३८९ सीएनजी पंपांपैकी फक्त २२५ पंप सुरू होते. ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील बहुतांश रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहने सीएनजीवर चालतात. त्यामुळे या भागातील सेवा पूर्णपणे विस्कळित झाली.

रिक्षा, टॅक्सी जागाेजागी उभ्या
सीएनजी नसल्याने हजारो रिक्षा आणि टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या. अनेक चालकांनी लांब पल्ल्याचे भाडे नाकारले. संध्याकाळपर्यंत शेअरिंग सेवाही ठप्प झाली हाेती. विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठा त्रास झाला.

वाहतुकीत ४० टक्के घट
सीएनजीच्या तुटवड्यामुळे सोमवारी शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात राेडावली. नेहमीच्या तुलनेत सुमारे ४० टक्के वाहतूक घटल्याने अनेक ठिकाणांची कोंडीतून सुटका झाल्याचे दिसले.

दोन हजार शालेय बस ठप्प
महानगरातील सुमारे आठ हजार शालेय बसपैकी दोन हजार बस या सीएनजीवर चालतात. पुरवठा बंद असल्याने या बस सोमवारी रस्त्यावर धावल्या नाहीत. त्यामुळे शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
--------------
महामुंबईतील सीएनजी वाहने
रिक्षा - ४ ते ४.५ लाख
टॅक्सी - २० हजार
शालेय बस - २ हजार
बेस्ट बस - १,२००
चारचाकी - ४ लाख
एकूण संख्या - सुमारे १० लाख
--------------
कालपासून सीएनजीचा  तुटवडा जाणवत आहे. रात्री ९ वाजता सीएनजी पंपावर गेलो असता मध्यरात्री १ वाजता सीएनजी मिळाले. त्यानंतर व्यवसाय करणे, गाडी मालकाला भाडे देणे शक्य नव्हते.  मुंबईतले अनेक जण  सीएनजी भरण्यासाठी नवी मुंबईत  येत आहेत. त्यामुळे सीएनजीचा  पुरवठा लवकर सुरळीत करावा. 
- सुशांत आवटे, रिक्षाचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com