लढा दिला त्यांच्याच स्मरणार्थ बेकायदा बॅनर
लढा देणाऱ्या ठाकूर यांचे
बेकायदा श्रद्धांजली बॅनर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : वांद्रे-खार परिसरातील नागरिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका आनंदिनी ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. बेकायदा होर्डिंग आणि बॅनरविरोधात त्यांनी मोठा लढा उभारला हाेता; मात्र त्यांच्या निधनानंतर वांद्रे-खार परिसरात भाजप आणि काही संघटनांनी त्यांचे श्रद्धांजलीचे बेकायदा बॅनर लावून त्यांच्या भूमिकेलाच छेद दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या बॅनरवर वांद्रे-खार-सांताक्रूझ रहिवासी संघटना आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांचे नाव झळकत आहे.
ज्येष्ठ पत्रकार सुचेता दलाल यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वरून रस्त्याच्या मधोमध लावलेल्या बॅनरवर टीका केली आहे. ज्या बेकायदा फलकांविरोधात आनंदिनी ठाकूर यांनी आयुष्यभर लढा दिला, त्याच प्रकारचे बॅनर्स त्यांच्या मृत्यूनंतर लावणे हा त्यांनी केलेल्या कामाला एका प्रकारे हरताळ फासण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आनंदिनी ठाकूर या वांद्रे-खार भागातील अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रभावी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. एच वेस्ट फेडरेशन आणि खार राहिवासी संघ या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामान्य मुंबईकरांना भेडसावणारे असंख्य प्रश्न मांडले आणि अनेकदा न्याय मिळवण्यासाठी जनहित याचिका दाखल केल्या.
१९९३च्या मुंबई दंगलीनंतर हिंदू-मुस्लिम संवाद पुन्हा सुरू व्हावा म्हणून स्थापन झालेल्या मोहल्ला समिती’ चळवळीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईत शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुंबईतील मोकळ्या जागा बचाव, फुटपाथ मुक्त करणे तसेच वांद्रे-खार परिसरातील बेकायदा क्लब आणि रेस्टॉरंट्स यांविरोधात त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला होता.

