दोन भावांच्या अहंकारांंमुळे राजकीय उलथापालथ

दोन भावांच्या अहंकारांंमुळे राजकीय उलथापालथ

Published on

दोन भावांच्या अहंकारामुळे राजकीय उलथापालथ
उल्हासनगरमध्ये भाजपचा अभेद्य ‘किल्ला’ ढासळला
उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : कॅम्प ४ व ५ मधील राजकारणाला धक्का देणारी राजकीय उलथापालथ झाली आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सर्वात सुरक्षित किल्ला मानला गेलेले पॅनेल १९ पूर्णपणे कोसळले आहे. या पॅनेलमधील भाजपचे सर्व चार माजी नगरसेवक आता शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. कॅम्प ४ व ५ ची सूत्रे सांभाळणाऱ्या दोन भावांच्या कथित अहंकारामुळे निर्माण झालेल्या तीव्र असंतोषाचा राजकीय स्फोट मानला जात आहे.

२०१७मध्ये या पॅनेलने चारही जागांवर विजय मिळवून भाजपचे अभेद्य वर्चस्व निर्माण केले होते; मात्र एकाच झटक्यात भाजपचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. पॅनेल १९मध्ये भाजपचे माजी नगरसेवक विजय पाटील, मीनाक्षी रवि पाटील, किशोर वनवारी आणि मीना सोंडे हे निवडून आले होते. यापैकी पाटील दाम्पत्य यापूर्वीच शिंदे गटात सक्रिय झाले होते. आता किशोर वनवारी आणि मीना सोंडे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करून हे पॅनेल पूर्णपणे शिंदे गटाच्या ताब्यात दिले आहे. या राजकीय प्रवेशानंतर पॅनेल १९ मधील भाजपचे २०१७चे संपूर्ण वर्चस्व संपुष्टात आले आहे. सर्व माजी जनप्रतिनिधी आता शिंदेंच्या शिवसेनेत सक्रिय झाले आहेत. भाजपसाठी हा एक मोठा रणनीतिक आणि संघटनात्मक धक्का आहे.

नेतृत्वाचा अति आत्मविश्वास
२०१७ मध्ये राजा गेमनानी कुटुंबाने संघटनात्मक बांधणी, लोकसंपर्क आणि प्रभावी रणनीतीमुळे पॅनेल १९मध्ये भाजपला मजबूत केले होते. नंतर नेतृत्वात बदल झाला. स्थानिक पातळीवरील नातेसंबंध तुटले आणि आत्मविश्वास अति आत्मविश्वासात बदलला. यामुळे मैदानातील वास्तविकता ओळखण्यात पक्ष कमी पडला आणि मतदारांशी असलेला संपर्कही कमी झाला. परिणामी, भाजपचा हा किल्ला हळूहळू कमकुवत होत गेला.

हुकूमशाही कार्यशैली
राजकीय तज्ज्ञांच्या मते, पॅनेल १९ भाजपच्या हातातून निसटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कॅम्प ४ व ५ ची सूत्रे सांभाळणाऱ्या दोन भावांची वादग्रस्त, अहंकारी व कथित हुकूमशाही कार्यशैली आहे. त्यामुळे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास ढासळला. स्थानिक नेतृत्वाने सर्वांना विश्वासात न घेता स्वतःचे निर्णय लादले. स्थानिक पातळीवरील नेतृत्वाने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. पारदर्शकतेचा अभाव आणि हितसंबंधाचे राजकारण यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी वाढली. या वागणुकीमुळे अनेक सक्रिय कार्यकर्ते बाजूला फेकले गेले आणि परिणामी पक्षाची संघटनात्मक बांधणी तुटली, असा आरोप करण्यात येत आहे.

भाजपपुढे मोठे आव्हान
आगामी २०२६ महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला पॅनेल १९मध्ये परत येण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. स्थानिक नेतृत्वात तातडीने बदल करणे, नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करणे आणि त्यांना पुन्हा सक्रिय करणे, नवीन चेहरे आणि मजबूत पॅनल तयार करणे, जमिनीवर सक्रिय व पारदर्शक संघटन उभे करणे, अंतर्गत नाराजीची तत्काळ सोडवणूक करणे अशी आव्हाने असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com