राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत येणारच
राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत येणारच
बदलापूरमध्ये हृता आव्हाडांचा ठाम विश्वास
बदलापूर, ता. १८ (बातमीदार) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदेची निवडणूक लढवणार नसल्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयानंतर मनसैनिक आणि महाविकास आघाडीत काही प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे; मात्र अशा परिस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी हृता आव्हाड यांनी एक मोठे राजकीय विधान केले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे अखेर महाविकास आघाडीसोबत येतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बदलापूर नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या अर्ज दाखल कार्यक्रमासाठी त्या बदलापुरात उपस्थित होत्या. नामनिर्देशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले, ज्यात राष्ट्रवादीकडून सहा उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
कुळगाव–बदलापूर नगरपालिका इमारतीबाहेर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची रॅली काढण्यात आली, ज्यात हृता आव्हाड विशेष उपस्थित होत्या. त्यांनी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीच्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराचे थैमान वाढल्याचा आरोप केला. भ्रष्टाचारमुक्त बदलापूर घडवायचे असेल, तर महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. सामान्य घरातील उमेदवार लोकांच्या समस्या जाणतो, या मुद्द्यावर भर देत हृता आव्हाड यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत हा नवा राजकीय संदेश दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्यासह उमेदवारांचे मनोबल वाढले, असे सांगण्यात आले.

