युती तुटली तरी ''मैत्रीपूर्ण लढत'' होणार : डॉ. शिंदे

युती तुटली तरी ''मैत्रीपूर्ण लढत'' होणार : डॉ. शिंदे

Published on

युती तुटली तरी ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार : डॉ. शिंदे
बदलापूर, ता. १७ (बातमीदार) : बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात युतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाले, पण औपचारिकरीत्या युती साध्य झाली नाही. तरीही या दोन्ही ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण लढत’ होईल, अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली.

युतीचा निर्णय न झाल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असला तरी, निवडणूक स्पर्धात्मक पण सहकार्याच्या भावनेतून लढवली जाईल, असे खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रभागनिहाय स्थानिक समीकरणांचा आदर राखत दोन्ही पक्ष परस्परांवर आघात न करता निवडणूक लढवतील, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बदलापूर नगरपालिका निवडणुकीत अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती. शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वीणा म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खासदार शिंदे आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही मिनिटे शिल्लक असताना ते बदलापूर नगर परिषदेच्या मुख्यालयात दाखल झाले. गाडीतून उतरून थेट धावतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेले. वीणा म्हात्रे त्यांची दोन ते अडीच तास वाट पाहत होत्या.

मनसेच्या माघारीवर टोला
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेने अंबरनाथ नगर परिषद निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना खासदार शिंदे यांनी मनसेवर टोला लगावला की,
मनसेची युती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आहे, त्यांनीच ठरवावे, काय करायचं ते. मनसेच्या माघारीमुळे अंबरनाथ व बदलापूर शहरातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त होत असताना, दुसरीकडे खासदार शिंदे यांच्याकडून व्यक्त झालेल्या शिवसेना-भाजप ‘मैत्रीपूर्ण लढतीच्या’ भूमिकेमुळे निवडणुकीचा रंग अधिकच गडद होत असल्याचे चित्र आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com