निकृष्ट रस्त्यांवर डांबराचा मुलामा
निकृष्ट रस्त्यांवर डांबराचा मुलामा
पनवेल पालिकेच्या प्रभागांत दुरुस्तीची कामे सुरू
पनवेल, ता. १८ (बातमीदार)ः महापालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वीच्या निकृष्ट डांबरीकरणामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती. खड्डे, वाहतुकीत अडथळ्यांमुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे पनवेल पालिकेने चार प्रभागांत रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, शहर अभियंता संजय कटेकर यांनी काही दिवसांपूर्वी विविध प्रभागांमधील रस्त्यांची पाहणी केली होती. रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत सूचना देणे, सुरू असलेल्या कामाचा वेग वाढवण्यावर विशेष भर देण्यात येत होता. अशातच नवीन पनवेल परिसरातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पावसाळ्यापूर्वी केलेल्या डांबरीकरणात गुणवत्तेचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे अल्पावधीत या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने त्यांच्या पुनर्बांधणीला पालिकेने प्राधान्य दिले आहे.
---------------------
सुरू असलेली कामे
खारघर : सेक्टर ११ रायन स्कूल रोड, कोपरा ब्रिज रोड, सेक्टर ३५ मधील रस्ते
कामोठे : सेक्टर ३४ मुख्य रस्ता, फुटबॉल स्टेडियम रोड, सेक्टर १२ मधील कृष्णा हॉटेल शेजारचा रस्ता
कळंबोली : सेक्टर १ इ, २ इ मधील रस्ते
नवीन पनवेल : सेक्टर ३, डिमार्ट रस्ता आणि इतर महत्त्वाचे मार्ग
----------------------------
पनवेल पालिकेमार्फत चारही प्रभागांमध्ये रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. प्रत्येक ठिकाणी गुणवत्तेला प्राधान्य देऊन, कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांची गैरसोय कमी करणे, हेच उद्दिष्ट आहे.
- गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त, पनवेल पालिका

