असमतोल रस्ते जीवाशी घोर

असमतोल रस्ते जीवाशी घोर

Published on

भिवंडी, ता. १८ (बातमीदार) : भिवंडीतील पेव्हरब्लॉक आणि सिमेंटच्या आरसीसी रस्त्यांमधील असमानता व खोल खड्ड्यांमुळे जीवघेणे अपघात सातत्याने घडत आहेत. छोट्या वाहनांवरून जाणाऱ्या नागरिकांना दररोज उंच-खोल रस्त्यावर आपटून दुखापती होत आहेत. यापूर्वी अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना घडल्या असूनही पालिका प्रशासन रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

कल्याण नाका–नदीनाका, कल्याण रोडसह शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर पावसाळ्यात साचलेले पाणी, निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण आणि आरसीसी रस्त्यांना जोडून बसवलेले पेव्हरब्लॉक यांच्या असमतोल रचनेमुळे धोकादायक रस्ते तयार झाले आहेत. काही ठिकाणी मोठे चढउतार तयार झाल्याने वाहनांना धक्के बसतात. यामुळे अनेकांना मणका व कंबरेच्या दुखण्याचा त्रासही सुरू झाला आहे.

शहरातील नव्याने बनवलेल्या आरसीसी रस्त्यांना वेळोवेळी फोडून त्यात गॅसवाहिनी, सीसीटीव्ही वाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले. मात्र, ते रस्ते पुन्हा व्यवस्थित दुरुस्त न केल्याने नव्या रस्त्यांमध्येच खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी, या भागांमध्ये दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांची वारंवार मागणी असूनही पालिका प्रशासन दुरुस्तीची कामे करत नसल्याने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपघातांच्या घटना
* १५ ऑक्टोबरला राज सिंग (२०) हा युवक दुचाकीवरून राजनोलीकडे जात होता. त्याचवेळी साईबाबा मंदिराजवळ दोन रस्त्यांमधील खोल खड्ड्यात दुचाकी घसरली आणि तेव्हाच मागून आलेल्या ट्रेलरखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडल्याने थोडक्यात बचावला.
* यापूर्वीही वंजारपाटी नाका–बागेंफिर्दोस मार्गावर रस्त्यांतील असमानतेमुळे द्दुचाकी घसरून एका डॉक्टराचा कंटेनरखाली आल्याने मृत्यू झाला होता. शहरातील विविध भागांमध्ये दररोज नागरिक पडून जखमी होत असल्याने तातडीने खड्डे भरावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

पावसाळ्यात खड्डे भरणे कठीण होते. मात्र दिवाळीनंतर शहरातील खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. पाचही विभागांमध्ये संबंधित कंत्राटदार नेमले आहेत. लवकरच सर्व खड्डे भरून नागरिकांना दिलासा मिळेल.
- जमील पटेल, शहर अभियंता, भिवंडी महापालिका

भिवंडी : शहरातील असमतोल रस्त्यांमुळे अपघाताच्या घटनांत वाढ होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com