सार्वजनिक-खासगी भागीदारीला गती!
सार्वजनिक-खासगी भागीदारीला गती!
पालिकेच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : महापालिकेच्या आरोग्यसेवांमध्ये सुरू असलेल्या पीपीपी म्हणजेच सार्वजनिक-खासगी भागीदारीला जोरदार विरोध होत असला तरी या प्रक्रियेला वेग आलेला दिसत आहे. मुंबई महापालिकेने नियोजनानुसार निविदा उघडण्याचे काम सुरू ठेवले आहे.
रक्तपेढीपासून एमआरआय-सीटी स्कॅनपर्यंत प्रतिसाद मिळत आहे. आरोग्यसुविधांची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने पालिकेने खासगी सहकार्याचा मार्ग स्वीकारला आहे. याअंतर्गत रक्तपेढ्यांसाठी नऊ निविदा प्राप्त झाल्या आहेत. कार्डियोलॉजी व कॅथलॅबसाठी तीन, एमआरआय-सीटी स्कॅनसाठी सहा, डायलिसिससाठी चार आणि अल्ट्रासोनोग्राफी सेवांसाठी पाच निविदांचा प्रतिसाद मिळाला आहे. तसेच शताब्दी रुग्णालय परिसरातील एमबीबीएस महाविद्यालयासाठी दोन निविदा आल्या आहेत. गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाच्या आवारात प्रस्तावित १०० विद्यार्थ्यांचे खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या अध्यापन रुग्णालय प्रकल्पासाठी दोन बोलीदारांनी स्वारस्य दाखवले आहे.
मोठा प्रकल्प असल्याने पालिकेकडून याची वेगळी छाननी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पंजाबी गल्लीतल्या डायग्नोस्टिक सेंटरसाठी एकच निविदा आली असली तरी पालिकेने प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. दरम्यान, आरोग्य क्षेत्रातील या प्रक्रियेबाबत काही कर्मचारी संघटना आणि राजकीय गटांनी आक्षेप नोंदवले आहेत. मात्र नागरिकांना अधिक चांगल्या, सुटसुटीत आणि कार्यक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पालिकेच्या पीपीपी मॉडेल राबवण्याच्या धोरणाला तज्ज्ञांकडून विरोध होत आहे.
पीपीपी तत्त्वामध्ये आरोग्यसेवांच्या शुल्काचा दर निश्चित राहणार नाही. हळूहळू शासकीय रुग्णालयांचा लाभ गरीब रुग्णांसाठी कमी होणार. इमारत सरकारची मात्र फायदा खासगी लोकांचा, असे हे धोरण आहे.
- अभिजित मोरे, जन आरोग्य चळवळ, कार्यकर्ते
मोठ्या शस्त्रक्रिया किंवा खर्चिक मशीनसाठी पीपीपी तत्त्व राबवले तर त्याचा रुग्णांना फायदा होईल. पण सरसकट पीपीपी तत्त्व राबवणे चुकीचे आहे. पीपीपी तत्त्व राबवल्यास सरकारचा अतिरिक्त खर्च कमी होण्यास मदत होईल. रुग्णांना योग्य व चांगली उपचार सुविधा उपलब्ध होईल.
- डॉ. शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, आयएमए नॅशनल मेडिकल स्टुडंट नेटवर्क
......................................

