भाजपची फोडाफोडी

Published on

भाजप, शिंदे गटात जोरदार रस्सीखेच
महेश पाटील यांच्या प्रवेशानंतर आमदार राजेश मोरेंची टीका
डोंबिवली, ता. १८ : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे गटाचे तालुकाप्रमुख महेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिंदे गटाच्या जिव्हारी लागला आहे. या प्रवेशानंतर आमदार राजेश मोरे यांनी मित्रपक्ष भाजपवर थेट टीका केली आहे. ‘‘भाजपकडून पक्ष फोडाफोडी होत असताना, मित्रपक्ष कायम निवडणुका आल्या की हे काम करतो,’’ असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

मंगळवारी (ता. १८) शिंदे गटाला मोठा धक्का बसला. तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्यासह वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, आणि सायली विचारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिंदे गटात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महेश पाटील यांनी आपल्या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

महेश पाटील म्हणाले की, ‘‘मोक्क्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट मिळवून देण्यात वरिष्ठांचा हात होता. या घटनेनंतर शिवसेनेत (शिंदे गट) राहण्याचा प्रश्नच राहिला नाही. त्यामुळेच मी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षांतर्गत नाराजी आणि निर्णय प्रक्रियेतील हस्तक्षेप याकडे थेट बोट ठेवत महेश पाटील यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केल्याचे मानले जात आहे.

शिंदे गटाची टोलेबाजी
महेश पाटील यांच्या आरोपांनंतर लगेचच आमदार राजेश मोरे यांच्यासह रमेश म्हात्रे, राजेश कदम आदी मान्यवरांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. आमदार राजेश मोरे म्हणाले की, गेलेल्यांना शुभेच्छा: ‘‘जे गेले आहेत, त्यांना आणि मित्रपक्षाला शुभेच्छा. त्यांच्या जाण्याने शिवसेनेला काही फरक पडत नाही.’ आम्ही केलेल्या विकासाच्या आधारे जनता निर्णय घेईल. ते (महेश पाटील) जे आरोप करत आहेत, ते त्यांच्या अंतर्गत वादाचे आहेत. पक्षाशी त्याचा काहीच संबंध नाही.’’ ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मित्रपक्षाची भूमिका बदललेली नाही. मित्रपक्षाने फोडाफोडीचे काम केले आहे. कार्यकर्ते फोडताना त्यांनी विचार केला पाहिजे की आपला युतीचा पक्ष आहे.’’

महायुतीचा निर्धार
महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत कोणत्याही निवडणुका आल्या की नेहमी मित्रपक्ष आम्हाला त्रास देतो, पण आम्ही सक्षम आहोत, कोणाच्या येण्या-जाण्याने आम्हाला फरक पडत नाही. या महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल. आजच्या या घडामोडींमुळे कल्याण-डोंबिवलीतील निवडणूक वातावरण अधिक तापले असून, शिंदे गटातील गळती आणि भाजप-शिवसेनेतील स्थानिक संघर्षांमुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com