कळवा, दिवा, मुंब्र्यात कचराकोंडी
कळवा, दिवा, मुंब्र्यात कचराकोंडी
डायघर कचर प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा आणि डायघर परिसरामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून गंभीर कचराकोंडीची समस्या निर्माण झाली आहे. डायघर येथे उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केल्यामुळे प्रकल्पस्थळी येणाऱ्या कचरा वाहनांची वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. यामुळे या भागांतील कचरा उचलणे पूर्णपणे ठप्प झाले आहे. या कचराकोंडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन केले. त्यानंतर या समस्येचे मूळ कारण समोर आले.
कळवा, मुंब्रा, दिवा, डायघर या पालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. कचऱ्याच्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले असून, या अस्वच्छतेमुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने डायघर येथे कचरा प्रकल्प उभारला, पण स्थानिकांचा त्याला सुरुवातीपासून विरोध होता. प्रकल्पात कचऱ्यापासून वीजनिर्मिती केली जाईल, असे आश्वासन देऊन पालिकेने स्थानिकांची समजूत काढली होती. प्रत्यक्षात मात्र वीज निर्मितीचे काम सुरूही झालेले नाही. केवळ कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे.
वाहतूक ठप्प
प्रकल्पाच्या परिसरामध्ये होणाऱ्या अवजड कचरा वाहतुकीमुळेही दुर्गंधी पसरत असल्याने स्थानिकांनी एकत्र येऊन गेल्या तीन-चार दिवसांपासून वाहतूक पूर्णपणे अडविली आहे. यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा आणि डायघर भागांतील दररोज सुमारे ४० ते ५० कचरा वाहनांची वाहतूक ठप्प झाली असून, यातून कचराकोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
कचरा आतकोलीला वळवला
स्थानिक रहिवाशांचा प्रकल्पाला असलेला विरोध आणि कचराकोंडीमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती यामुळे ठाणे पालिका प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पालिका प्रशासन स्थानिकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. ही समस्या तातडीने सोडवण्यासाठी पालिकेने आता कळवा, मुंब्रा, दिवा आणि डायघर भागातील कचरा थेट आतकोली कचराभूमी येथे नेण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. या तात्पुरत्या उपायाने कचराकोंडी सुटेल अशी अपेक्षा आहे, परंतु डायघर प्रकल्पाला स्थानिक विरोध ही ठाणे पालिकेसाठी एक मोठी राजकीय आणि प्रशासकीय समस्या बनली आहे.
परिसरात दुर्गंधी
मुद्दा तपशील
बाधित परिसर कळवा, मुंब्रा, दिवा, डायघर
कचराकोंडीची तीव्रता गेल्या तीन ते चार दिवसांपासून कचरा उचलणे ठप्प
वाहतूक बाधित वाहने दररोजची सुमारे ४० ते ५० कचरा वाहने बाधित
मूळ कारण पालिकेच्या वीजनिर्मितीच्या आश्वासनाचे उल्लंघन (केवळ कचऱ्यावर प्रक्रिया सुरू)
तत्काळ उपाययोजना कळवा, मुंब्रा, दिवा भागातील कचरा आतकोली कचराभूमी येथे वळवण्यात आला.
परिणाम दुर्गंधी आणि परिसरात रोगराई पसरण्याची भीती
