शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा ''सुरुंग''

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा ''सुरुंग''

Published on

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सुरुंग
कल्याण-डोंबिवलीत फोडाफोडी; निवडणुकीची रणधुमाळी
डोंबिवली, ता. १९ : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा भाजपचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपने थेट शिंदे गटाच्या फळीला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. मित्रपक्षांमधील ही अंतर्गत चुरस आणि फोडाफोडीमुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे गटातच जोरदार चुरस रंगली आहे. डोंबिवली पश्चिमेतील नाट्यमय घडामोडींत शिंदे गटातून ठाकरे गटात गेलेले दीपेश म्हात्रे यांना पुन्हा खेचण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न फसला. दीपेश म्हात्रे यांनी धनुष्यबाण नाकारत अचानक कमळ हातात धरले आणि भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामुळे ठाकरे गटापेक्षा शिंदे गटातच अधिक खळबळ माजली. हा धक्का पचवण्याआधीच भाजपने केलेल्या फोडाफोडीला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने विकास म्हात्रे यांना रातोरात गटात सामील करून घेतले. तसेच भाजपच्या गोटात जाण्याच्या चर्चेत असलेले माजी शहरप्रमुख महेश गायकवाड यांना तातडीने कल्याण पूर्व-उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून घोषित करून त्यांना रोखून धरले.

पक्षांतराच्या या चढओढीनंतर काहीसा शांत झालेला माहोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा पेटवला. शिंदे गटातील युवासेनेचे कार्यकर्ते आणि दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे यांचा पक्षप्रवेश करून भाजपने शिंदे गटाच्या मुळावरच घाव घातला. अनमोल म्हात्रे यांच्या प्रवेशानंतर काही तासांतच तालुकाप्रमुख महेश पाटील, त्यांच्या भगिनी माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील आणि माजी नगरसेविका सायली विचारे यांचाही भाजपने प्रवेश घडवून एकाच दिवसात शिंदे गटावर सलग प्रहार केले.

दोन्ही बाजूंनी फळी मजबूत करण्याची धडपड
कल्याण-डोंबिवलीत सध्या ऑपरेशन ओव्हरटेक मोहीम सुरू असून, दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवर ताकद वाढवण्यासाठी कडवी झुंज देत आहेत. याआधी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील, मनसेतील राजन मराठे, ज्योती मराठे, काँग्रेसचे सदाशिव शेलार, राष्ट्रवादीचे नंदू धुळे मालवणकर, कविता म्हात्रे यांसारख्या विविध पक्षांतील नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

भाजपत झालेले प्रमुख प्रवेश
भाजपनेही काँग्रेसचे जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर, हर्षदा भोईर, राष्ट्रवादीचे नंदू म्हात्रे आणि मनसेतील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल्या गोटात सामील करून घेतले आहे. विविध पक्षांतील अनेक नेत्यांचे शिंदे गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले होते. आता भाजपातही काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसेमधील अनेक चेहरे दाखल झाले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवर आपापली फळी मजबूत करण्यासाठी कडवी झुंज देताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com