सातपाटी समुद्रातील सर्वेक्षण नागरिकांनी रोखले
सातपाटी समुद्रातील सर्वेक्षण नागरिकांनी रोखले
पाण्यात उड्या घेत आक्रोश, ग्रामपंचायतीचा परवानगीस नकार
पालघर, ता. १८ ः केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्र यांच्यामार्फत सातपाटी समुद्रातील सर्वेक्षण सुरू असताना नागरिकांनी आक्रोश केला. तसेच समुद्रात उड्या घेऊन सर्वेक्षणला जाणाऱ्या बोटीला मंगळवारी सकाळी थांबवले. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे सर्वेक्षण सातपाटी ग्रामस्थांनी थांबवले होते. मोठा जनआक्रोश धडकल्यामुळे हे सर्वेक्षण थांबवण्यात आल्याचे सर्वेक्षण संस्थेमार्फत जाहीर केले गेले.
दोन दिवसांपूर्वी सर्वेक्षणाचा घाट नागरिकांकडून सातपाटीत थांबवण्यात आला होता. त्या वेळी पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले होते, मात्र या सर्वेक्षणाला रीतसर परवानगी असल्याने हे सर्वेक्षण मंगळवारी सुरू होणार असल्याचे पोलिसांनी सोमवारी रात्री सांगितले, मात्र ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नसताना हे सर्वेक्षण सुरू कसे केले, असा प्रश्न उपस्थित करत गावातील नागरिकांनी सोमवारी सुरू होणारे सर्वेक्षण हाणून पाडले.
मुरबे बंदर प्रकल्पामुळे गावाच्या अस्तित्वावर, कुटुंबाच्या उपजीविकेवर आणि समुद्रातील हक्कांवर थेट संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे असे सर्वेक्षण गावाच्या व ग्रामसभांच्या परवानगीशिवाय करू नये, असे सांगत सर्वेक्षणासाठी नेली जाणारी बोट गावकऱ्यांनी पाण्यात उतरून थांबवली. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. काही तास संघर्ष झाल्यानंतर हे सर्वेक्षण थांबवण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेचे अधिकारीवर्ग माघारी परत फिरत असताना गावकऱ्यांनी त्यांचे वाहन रोखून धरले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून सातपाटीच्या राम मंदिरात यासंदर्भात सविस्तर बैठक बोलावली. या बैठकीमध्ये जोवर ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीची परवानगी घेत नाही, तोवर हे सर्वेक्षण सुरू होऊ देणार नाही, असे सांगण्यात आले.
ग्रामपंचायतीची अधिकृत परवानगी, कायदेशीर प्रक्रिया आणि ग्रामसभेचा निर्णय घेतल्याशिवाय कोणताही सर्व्हे आम्ही होऊ देणार नाही. प्रशासनाने बळाचा वापर करून दडपण आणण्याचा प्रयत्न केला, तर सातपाटी गाव त्याला एकत्रित प्रतिकार करेल, असे गावकऱ्यांनी सांगितले.

