नवी मुंबई शहराला राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मान

नवी मुंबई शहराला राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मान

Published on

नवी मुंबई शहराला राष्ट्रीय जल पुरस्कार
राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली पार पडला सोहळा
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. १८ : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे आयोजित ‘सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४’मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महापालिकेस देशात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार मंगळवारी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथील विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, केंद्रीय जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री डॉ. राजभूषण चौधरी, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयांतर्गत जल संसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे सचिव व्ही. एल. कंथाराव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे उपस्थित होते.
नवी मुंबई शहर स्वत:च्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसमृद्ध शहर असून, पाण्याचा पुनर्वापर केला जात असल्याने पिण्याच्या पाण्याची लक्षणीय बचत होत आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मिटरिंग पद्धतीद्वारे मोजमाप होते. दैनंदिन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया केली जाते. अत्याधुनिक एसबीआर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत असून, ४५४ द.ल.लि. क्षमतेची सात मलप्रक्रिया केंद्रे कार्यान्वित आहेत. याशिवाय ५२.५ द.ल.लि. क्षमतेचे चार टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प कार्यान्वित आहेत. अल्ट्राफिल्टरेशन व यूव्ही तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियाकृत पाण्यावर अधिक उच्चतम दर्जाची पुनर्प्रक्रिया केली जाते. नवी मुंबई महापालिकेची सुयोग्य जलवितरण प्रणाली आणि पाण्याचा पुनर्वापर अशा उल्लेखनीय बाबींचा विचार राष्ट्रीय जलपुरस्कारासाठी करण्यात आला. जलशक्ती मंत्रालयअंतर्गत जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या या पुरस्काराकरिता देशभरातून ७५१ प्रस्ताव प्राप्त होते. त्या प्रस्तावांची जलसंपदा विभागाकडून तपासणी करण्यात आली. तसेच केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळ यांनी प्रत्यक्ष भेटी देत पाहणी करून तपशीलवार अहवाल सादर केले. त्यानंतर स्वतंत्र निर्णायक मंडळाने पारदर्शक स्कोअरकार्डप्रणाली वापरून त्रयस्थ ज्युरी समितीद्वारे मूल्यांकन केले. या मूल्यांकनाच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली असून, स्थानिक स्वराज संस्था गटात नवी मुंबई महापालिका देशात प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय जल पुरस्काराची मानकरी ठरली आहे. त्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेचे उपक्रम हे अमृत योजना आणि ड्रिंक फ्रॉम टॅप अशा राष्ट्रीय धोरणांशी सुसंगत आहेत. तसेच महापालिकेने राबविलेल्या नावीन्यपूर्ण जलसंधारण उपाययोजना, सांडपाणी पुनर्वापर उपक्रमातून पर्यावरण संरक्षणासोबतच पिण्याच्या पाण्याची बचत, शहरी भागात सुनियोजित आणि शाश्वत पाणी व्यवस्थापन अशा विविध बाबींमुळे देशातील इतर शहरांसाठी अनुकरणीय जलव्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन करणारे शहर म्हणून प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने नावाजले गेले आहे.
-----------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com