नगराध्यक्षपदासाठी गृहलक्ष्मी मैदानात
नगराध्यक्षपदासाठी गृहलक्ष्मी मैदानात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ ः अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदेत नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून सत्ता हाती यावी यासाठी दोन्ही ठिकाणी दिग्गज स्थानिक नेत्यांनी आपल्या गृहलक्ष्मींना मैदानात उतरवले आहे. शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस आणि भाजप या सर्वच प्रमुख पक्षाने येथील स्थानिक पदाधिकारी, नेत्यांच्या पत्नीना, सुनांना नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवले आहे. जिंकून येण्याचे गणित आणि सत्तासमीकरण यामागे असल्याचा दावा केला जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील अ वर्ग नगर परिषदा असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदांसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. या वेळी पहिल्यांदाच पॅनेल पद्धतीने या दोन्ही नगर परिषदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, तर २०१५ प्रमाणे जनतेमधून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे, मात्र त्यापूर्वीच नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने या सोडतीने प्रमुख मोठ्या नेत्यांच्या, ज्येष्ठ माजी नगरसेवकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. आणखी पाच वर्षे त्यांना या संधीची वाट पाहावी लागणार असल्याने त्यांनी आपल्या पत्नीला नगराध्यक्षपदाचा चेहरा बनवला आहे.
अंबरनाथमध्ये लढत रंगणार
अंबरनाथ नगराध्यक्षपदासाठी एकीकडे दिग्गजांनी आपल्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असताना भाजपने एका सुनेला ही संधी दिली आहे. त्यामुळे येथे रंगत वाढणार आहे.
१) अंबरनाथ नगरपरिषदेसाठी माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद वाळेकर यांच्या पत्नी मनीषा वाळेकर यांनी आपला नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला आहे. त्यांनी याआधीही अडीच वर्षे नगरध्यक्षपद भूषवले असून, तीन वेळा नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या आहेत.
२) भाजपकडून माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री करंजुले यांनी आपला नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला आहे.
३) काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पत्नी नूतन पाटील तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदाशिव पाटील यांच्या सून अश्विनी पाटील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.
बदलापुरात चुरस वाढणार
कुळगाव-बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे.
१) कुळगाव-बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेच्या वतीने यापूर्वीच माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या पत्नी वीणा म्हात्रे यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला आहे.
२) भाजपच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका रूचिता घोरपडे यांना संधी देण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष तसेच चार वेळा घोरपडे नगरसेवक होते.
नवीन चेहऱ्यांनाही संधी
घराणेशाहीच्या शर्यतीमध्ये काही नवीन चेहऱ्यांनाही संधी बदलापुरात मिळाली आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रियांका गवळी, मनसेच्या संगीता चेंदवणकर आणि आम आदमी पार्टीच्या आस्था मांजरेकर यांचा समावेश आहे. कुटुंबात राजकारणाची पार्श्वभूमी नसतानाही प्रियांका गवळी यापूर्वी उपनगराध्यक्ष होत्या. संगीता चेंदवणकर यांनी यापूर्वी आमदारकीसाठी प्रयत्न केले होते, तर आपच्या आस्था मांजरेकर यांचे वडील पूर्वी काँग्रेसचे सक्रीय पदाधिकारी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
