उल्हासनगरातील गृहप्रकल्पावर श्रेयवाद
उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या सर्वांत मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पामुळे शहरात विकासाची नवी दारे उघडताना दिसत आहेत. या विकासाच्या छायेत आता राजकीय श्रेयवादाचा संघर्ष पेटला आहे. भाजपच्या आमदार कुमार आयलानी आणि शिवसेना (शिंदे गट)चे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे दोन्ही नेते ‘३,५७८ परवडणाऱ्या घरांच्या महाप्रकल्पाचे श्रेय’ स्वतःकडे खेचण्यास सज्ज झाले आहेत.
उल्हासनगरातील गरीबांसाठी सुरू होणारा ऐतिहासिक प्रकल्प हजारो कुटुंबांसाठी आशेचा किरण आहे, तसाच सत्ताधारी गटांसाठी तो ‘राजकीय शक्तिपरीक्षा’ ठरणार असल्याचे चित्र आहे. प्रधानमंत्री आवास योजना २.० (शहरी)अंतर्गत तीन हजार ५७८ परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी ७२३ कोटींचा गृहनिर्माण महाप्रकल्प मंजूर झाल्यानंतर शहरात विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. संतोषनगर आणि प्रेमनगर टेकडी परिसरातील या आधुनिक व किफायतशीर घरांच्या उभारणीमुळे हजारो गरीब कुटुंबांचे ‘घराचे स्वप्न’ साकार होणार आहे. परंतु, या प्रकल्पाच्या मंजुरीनंतर शहरात एक वेगळीच राजकीय हलचल निर्माण झाली आहे. भाजप आणि शिंदे गटात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
कोणाचा पाठपुरावा?
दोन्ही पक्षांच्या प्रचारयंत्रणेने स्वतःच्या बाजूने तथ्यांची मांडणी करून वातावरण तापवले आहे. उल्हासनगरसारख्या सिंधीबहुल शहरात दोन्ही पक्ष आपली राजकीय पकड मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प ‘मोठा ट्रम्प कार्ड’ ठरू शकतो, हे दोन्ही बाजूंना चांगलेच ठाऊक आहे.
१) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा दावा आहे की राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मनपा पातळीवर स्वतःच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला.
२) तर भाजपचे आमदार कुमार आयलानी आणि जिल्हाध्यक्ष राजेश वाधरिया यांचे म्हणणे आहे की, हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे आम्ही केलेल्या सततच्या प्रयत्नांचे आणि दिल्ली-मुंबईतील राजकीय संपर्कांचे फलित आहे.
नागरिकांच्या अपेक्षा
शहरातील सामान्य नागरिकांना राजकीय श्रेयवादापेक्षा घरांची वास्तविक उभारणी, पारदर्शक वाटप आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम याचीच अपेक्षा आहे. उल्हासनगरातील हजारो बेघर, झोपडपट्टीतील आणि कुडीत राहणाऱ्या कुटुंबांसाठी हा प्रकल्प आयुष्य बदलणारा ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

