डहाणू–चारोटी राज्य मार्गावरील काँक्रीटीकरण रखडले
खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त
डहाणू-चारोटी राज्यमार्गाचे काँक्रीटीकरण रखडले
कासा, ता. १९ (बातमीदार) : डहाणू-नाशिक राज्यमार्गावरील डहाणू ते चारोटी या २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. डहाणू नगर परिषद हद्दीतील झाडे तोडण्याची परवानगी न मिळाल्याने आणि जागेच्या अडचणींमुळे हे काम ठप्प झाले आहे. परिणामी, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून नागरिकांना धुळीच्या त्रासाला आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन ११ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले होते. या कामासाठी १९२ कोटी रुपये निधी मंजूर आहे आणि त्याचे कंत्राट मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गाचे काम करणाऱ्या ‘आर. के. सी.’ या कंपनीला देण्यात आले आहे. प्रकल्पासाठी अडीच वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे, परंतु परवानग्यांच्या विलंबातच एक वर्ष खर्च झाल्याने आता केवळ दीड वर्ष उरले आहे. परवानग्या न मिळाल्यास निधी परत जाण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नियोजित कामाची रूपरेषा
अपना बाजार ते सरावली जकात नाकापर्यंत रस्ता २२ मीटर रुंद करण्याचे नियोजन आहे, तसेच गटारबांधणीचे कामही होणार आहे. के. टी. नगर ते मिशन रुग्णालयादरम्यानचा ४५० मीटरचा रेल्वे उड्डाणपूल रेल्वे प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. शहर वगळता जकात नाका ते चारोटीपर्यंतचा रस्ता १० मीटर रुंद होणार आहे. रानशेत-सारणी यादरम्यान वन विभागाच्या हद्दीत डांबरी रस्ता ठेवण्याची तरतूद आहे. एकूण ५३ पाइप मोऱ्यांची पुनर्बांधणी, एक मोठा व एक लहान पूल आणि गटार बांधणीची महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत.
वाहतूक कोंडी
चारोटी, गंजाड, आशागड यांसारख्या बाजारपेठांमध्ये अर्धा-अर्धा तास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे वाहनचालक राकेश शिंदे यांनी सांगितले.
जीर्ण पूल आणि रुंदीकरण
रस्त्यावर खड्डे पडले असून, अनेक पूल व मोऱ्या दुरवस्थेत आहेत. वाढत्या वाहतूक दाबामुळे हा मार्ग चारपदरी रुंद करणे अत्यावश्यक असल्याची मागणी महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी केली आहे. काँक्रीटीकरण सुरू होईपर्यंत तरी खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून ठेकेदार कंपनीकडे होत आहे.
काँक्रीटीकरणासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदार कंपनीला सूचना दिल्या असून, काम सुरू केले आहे. सर्व परवानग्या मिळताच मुख्य कामाला जलद सुरुवात होईल.
नितीन पगारे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

