धसई जिल्हा परिषद गटात उमेदवारीसाठी चढाओढ?

धसई जिल्हा परिषद गटात उमेदवारीसाठी चढाओढ?

Published on

धसई जिल्हा परिषद गटात उमेदवारीसाठी ‘चढाओढ’
एका जागेसाठी अनेक दावेदार, बंडखोरीचा धोका!
टोकावडे, ता. १९ (मुरबाड) : मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी धसई गटात उमेदवारीसाठीची चुरस शिगेला पोहोचली आहे. धसई गट सर्वसाधारण आरक्षित झाल्यानंतर या एका जागेसाठी सर्वच पक्षांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, जवळपास १५ ते १६ इच्छुक उमेदवार सक्रिय झाल्याने पक्षांतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

‘‘मी वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केले. त्यामुळे तिकीट मलाच मिळाले पाहिजे,’’ अशी मागणी अनेक इच्छुक करत असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर मोठा तिढा निर्माण झाला आहे. धसई गट सर्वसाधारण आरक्षित झाल्यानंतर या ठिकाणी स्थानिक उमेदवार असावा, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे, ज्यामुळे अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मोठे नेते आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळावे, यासाठी गटबांधणी आणि तडजोडींची राजकीय सूत्रे वापरत आहेत, तर काही जण प्रतिस्पर्धी इच्छुकांचे गणित बिघडवण्यासाठी गुप्त राजकीय संपर्काचा वापर करत असल्याची चर्चा आहे.

तिकीटवाटप हीच ‘अग्निपरीक्षा’
तिकीटवाटपानंतर पक्षातील नाराजीचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. योग्य काम करूनही तिकीट न मिळालेले अनेक इच्छुक अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी दर्शवत आहेत. गाव-वाडी-पाड्याशी नाळ जोडलेले आणि विविध संस्थांमध्ये (ग्रामपंचायत, बाजार समित्या, सोसायट्या) सक्रिय असलेले इच्छुक उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहिल्यास, ते पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचे राजकीय गणित बिघडवू शकतात. त्यामुळे तिकीटवाटप हीच पक्षांसाठी मोठी ‘अग्निपरीक्षा’ ठरणार आहे.

निवडणुकीचे बदलते स्वरूप
धसई गटातील जिल्हा परिषद निवडणूक केवळ पक्षनिष्ठेवर आधारित राहणार नसून, उमेदवाराचा व्यक्तिगत परिचय, स्थानिक नेतृत्व, मतदारांशी असलेला व्यक्तिगत संपर्क आणि विविध संस्थांमधील पकड, या घटकांचा प्रभाव निर्णायक ठरणार आहे. या सर्व कसोट्यांवर खरा उतरणारा उमेदवारच या गटात यशस्वी होईल, असे संकेत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com