एमआयडीसीत अंधाराचे राज्य
एमआयडीसीत अंधाराचे राज्य
अंतर्गत रस्त्यांवरील प्रवास धोक्याचा
वाशी, ता. १९ (बातमीदार)ः एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधार पडत असल्याने वाहनचालकांसाठी धोक्याचा प्रवास ठरत आहे. अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे जीवितहानी होण्याचा धोका बळावला आहे.
काही ठिकाणी पथदिवे बंद आहेत, तर काही ठिकाणी झाडांआड दिव्यांचा प्रकाश गेल्याने रस्त्यांवर अपुरा प्रकाश पडत आहे. औद्योगिक वसाहतीत साडेचार हजारांच्या आसपास छोटे-मोठे कारखाने असून, पाच लाख कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे, पण दिघ्यापासून शिरवणेपर्यंत विस्तीर्ण अशा या औद्योगिक वसाहतीतील कामगारवर्गाची गैरसोय सुरू आहे. एमआयडीसी मुख्य रस्त्याची सुधारणा केली असली तरी अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. दिवसाही प्रवास करणे कठीण होत असताना रात्री पथदिवे बंद असल्याने प्रवास अधिकच खडतर झाली आहे. एमआयडीसीत अंतर्गत रस्त्यावर प्रकाशव्यवस्था नसल्याने अंधारातून जीव मुठीत घेऊन दुचाकीचालकांना प्रवास करावा लागत आहे.
------------------------------
पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
औद्योगिक वसाहतीत दिघ्यापासून शिरवणेपर्यंत चार मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. येथे चांगली परिस्थिती आहे. झोपडपट्टी भागात नगरसेवक असल्याने त्यांनी पाठपुरावा केल्याने पथदिवे चालू स्थितीत असतात, मात्र दिघा ते शिरवणे दोन हजार पथदिवे आहेत. यात महापे, रबाळे, खैरणे भागांत हजार तर तुर्भे-शिरवणे भागात ९५० पथदिवे आहेत, मात्र यापैकी अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक झाला आहे.
----------------------------
महिलांचा प्रवास असुरक्षित
तुर्भेतील सविता केमिकल्स, फायझर रस्ता येथे अत्याधुनिक पथदिवे बसवण्यात आले आहेत, मात्र अनेकदा पथदिवे बंद असतात. त्यामुळे महिला कामगारांना अंधारातून प्रवास असुरक्षित झाला आहे. त्यामुळे अंधार पडण्याआधीच ठाणे-बेलापूर महामार्ग गाठावा लागतो. अंधाराचा गैरफायदा घेत चोरीचे प्रकारही होत असल्याने भीतीचे वातावरण आहे.

