बदलापूर थंडीत ‘सर्वात आघाडीवर’; आजचे तापमान ११.९° वर!

बदलापूर थंडीत ‘सर्वात आघाडीवर’; आजचे तापमान ११.९° वर!

Published on

बदलापूर गारठले!
ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद
बदलापूर, ता. १९ (बातमीदार) ः ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक थंडीचा अनुभव बदलापूर शहराने घेतला आहे. बुधवारी पहाटे शहराचे तापमान तब्बल ११.९° सेल्सिअस इतके खाली आले. जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये बदलापूरनेच किमान तापमानाची नोंद केली आहे. वातावरणातील गारवा, पायवाटांवर दाटून आलेले धुके आणि दवबिंदूंनी भरलेली पहाट यामुळे बदलापूरकरांना हिवाळ्याची चाहूल नव्हे, तर कडाक्याच्या थंडीची अनुभूती’ मिळाली.
सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेले आणि बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीच्या काठावर वसलेले बदलापूर हे शहर दरवर्षी हिवाळ्यात किमान तापमानासाठी ओळखले जाते. यावर्षी सहा महिन्यांच्या लांबलेल्या पावसाळ्यामुळे हिवाळा लांबेल की काय असे वाटत होते, मात्र नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच तापमान झपाट्याने घसरू लागले आहे. परिणामी शहरात गारठा वाढला आहे. सकाळच्या सुमारास रस्त्यांवर चादरीत गुरफटलेले नागरिक, दुकानांबाहेर गरम चहाचे घोट आणि धुक्याची चादर असे चित्र अनुभवला येत आहे.
ठाणे जिल्ह्यात बुधवारी नोंदवलेले तापमान पाहता बदलापूर सर्वात थंड ठरले. बदलापूरचे ११.९°, कल्याण आणि पनवेलचे १४°, डोंबिवलीचे १४.५°, तर ठाणे आणि नवी मुंबईचे तापमान १५.२° सेल्सिअस नोंदले गेले. तापमानात झालेल्या या लक्षणीय घसरणीमुळे पुढील काही दिवस आणखी कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता हवामान खात्याचे अभ्यासक अभिजीत मोडक यांनी वर्तवली आहे. बदलापूरकरांनी सावधगिरी बाळगत हिवाळ्यातील आरोग्यसंबंधी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com