कट्टर समर्थकांना भाजपमधून उमेदवारी
अंबरनाथच्या राजकारणाला नवे वळण
शिवसेनेच्या नाराज समर्थकांना भाजपकडून उमेदवारी
अंबरनाथ, ता. २० ः अंबरनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर, शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या काही नातेवाइकांना आणि कट्टर समर्थकांना भारतीय जनता पक्षाने (भाजप) उमेदवारी देऊन मोठी राजकीय खेळी खेळली आहे.
गेल्या आठवड्यात अरविंद वाळेकर यांच्या अनेक नातेवाईक आणि समर्थकांनी शिवसेनेचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रवेश करणाऱ्यांमध्ये मीना वाळेकर, पवन वाळेकर, सुरेश वाळेकर, चंद्रकांत मोटे, आकाश वाळेकर, प्रकाश वाळुंज, रवींद्र पवार यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता.
प्रवेशाचा फायदा घेत भाजपने नाराज समर्थकांना लगेच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मीना वाळेकर यांना प्रभाग क्रमांक ४, खामकरवाडी- शिवलिंगनगर येथून भाजपकडून उमेदवारी मिळाली असून त्या सध्या निवडणूक लढवत आहेत. चंदा गान यांना प्रभाग क्रमांक १६, निसर्ग ग्रीन आणि नवरेनगर येथून उमेदवारी दिली आहे. चंदा गान आणि त्यांचे पती मिलिंद गान यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. चंदा गान यांना भाजपने या प्रभागातून उमेदवारी दिली आहे.
राजकीय समीकरणे बदलली
पक्षातून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना भाजपने लगेच उमेदवारी दिल्याने अंबरनाथच्या राजकारणाला मोठे नवे वळण मिळाले आहे. या प्रवेशामुळे शिवसेनेला स्थानिक पातळीवर मोठा धक्का बसला असून, भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

