तुटके दरवाजे, ढासळती स्लॅब
उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : उल्हासनगरातील सार्वजनिक महिला शौचालयांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, महिलांना रोजच्याच जगण्याची किंमत मोजावी लागत आहे. तुटके दरवाजे, ढासळते स्लॅब, असह्य दुर्गंधी आणि सुरक्षेचा तिढा अशा परिस्थितीत महिलांना शौचालयात जावे लागत आहे. विशेष म्हणजे ही परिस्थिती ‘महिलांच्या सुरक्षिततेवरील गंभीर उदासीनता’ अधोरेखित करते.
शहरातील सार्वजनिक महिला शौचालयांची अवस्था चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे महिलांच्या सुरक्षेला आणि सन्मानाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कॅम्प २ येथील कीर्ती पथावरील धोबीघाटसमोरील शौचालय, संभाजीनगर येथील स्वामी विवेकानंद शाळेजवळील शौचालय; तसेच नामदेव खंडागळे दुकानासमोरील महिला शौचालय या तिन्ही ठिकाणी परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे चित्र समोर आले आहे.
स्थानिक महिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत. आत अस्वच्छता आणि दुर्गंधीने श्वास रोखावा लागतो. सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने मजला सतत ओला आणि घसरडा होत आहे. अनेक शौचालयांमध्ये तर स्लॅब इतके कमजोर झाले आहे की, महिलांना कोसळण्याची आणि अपघाताची भीती वाटते. आणखी गंभीर बाब म्हणजे सेफ्टी टॅंकवर योग्य झाकण नसून फक्त एक फरशी ठेवून तो भाग बुजवला आहे, ज्यामुळे लहान मुले पडण्याचा धोका वाढला आहे.
उपाययोजनांची मागणी
नागरिकांचे म्हणणे आहे की ही परिस्थिती काही दिवसांची नसून महिनोन् महिने सुरू आहे. महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. नागरिकांनी स्थानिक मनसे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते योगीराज देशमुख यांच्यासोबत या ठिकाणांची त्वरित पाहणी करून आवश्यक दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षितता उपाययोजना तत्काळ करण्यात याव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
आंदोलनाचा इशारा
सार्वजनिक शौचालयांची जी परिस्थिती आहे, ती शहराच्या प्रशासनिक संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. सेफ्टी टॅंकवर फरशी ठेवून जीव धोक्यात घालणे हे दुर्लक्ष नसून सरळ बेफिकिरी आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात असेल तर शहराच्या विकासाचा काय अर्थ? तत्काळ काम सुरू न झाल्यास आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू, असा इशारा स्थानिक महिला ज्योती तिवारी यांनी दिला.
सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे म्हणजे आमच्यासाठी रोजचे संकट बनले आहे. स्लॅब कधी कोसळेल, दार कधी उघडेल याची भीती वाटत असते. महापालिका रोज महिला सक्षमीकरणाची भाषा करते; पण प्रत्यक्षात महिलांच्या मूलभूत गरजांकडेच दुर्लक्ष करते, ही मोठी शरमेची बाब आहे.
- गीता मलिया, स्थानिक महिला
महिलांच्या सन्मानाचा प्रश्न हा केवळ कागदोपत्री कार्यक्रमांनी सुटत नाही. सुरक्षित आणि स्वच्छ शौचालये देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. इतकी जीर्ण अवस्था असूनही दखल घेतली जात नाही, याचा अर्थ प्रशासनाला महिलांच्या समस्या महत्त्वाच्या नाहीत. आम्ही तातडीच्या कारवाईची मागणी करतो.
- योगीराज देशमुख, सामाजिक कार्यकर्ते
उल्हासनगर : येथील महिला शौचालयांची दयनीय अवस्था झाल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

