सिगारेटची राख उडल्याने तरुणावर हल्ला ;

सिगारेटची राख उडल्याने तरुणावर हल्ला ;

Published on

सिगारेटची राख उडाल्याने तरुणावर हल्ला ः गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : धावत्या कारमधून सिगारेटची राख अंगावर उडाल्याच्या रागातून एका त्रिकुटाने तरुणावर तलवारसारख्या धारदार हत्याराने हल्ला करण्यात आल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. या घटनेत गणेश दिवटे हा तरुण जखमी झाला असून, त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश दिवटे आणि त्यांचे दोन मित्र कारने जात असताना, सिगारेटची राख पाठीमागील दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाच्या अंगावर उडाली. त्या वेळी दुचाकीवरील त्रिकुटाने बघून फेकता येत नाही का? तू काय सुलतान मिर्झा आहेस का? ते ऐकून गणेशने कारचालक मित्र संजय लोटके यांना कार थांबवण्यास सांगितली. याच वेळी दुचाकीवरून खाली उतरलेल्या एकाने गणेशच्या कानाखाली मारली. त्याने त्याचे नाव नमन लांजे आहे असे म्हणून ते दुचाकीवरून निघून गेले. दरम्यान, कानाखाली मारल्याचा राग डोक्यात ठेवून गणेश यांनी वर्तकनगर येथील मित्र अनिकेत पाटील यांच्यासोबत मोटारसायकलवरून नमन लांजे याचा शोध घेतला. बुधवारी (ता. १९) जयेश बारच्या गल्लीच्या कोपऱ्यावर ते तिघे दिसून आले. दुचाकी थांबवताच त्या तिघांपैकी दोघांनी तलवारीसारखे हत्यार काढून गणेशच्या हातावर आणि डोक्यावर वार केले, तर अनिकेतला त्या हत्याराचा धाक दाखवत मारहाण केली. दरम्यान, गणेश यांचे मित्र कारमधून येताच, त्या त्रिकुटाने तेथून पळ काढला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com