मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये सुरु असलेले बेकायदेशीर कॉल सेंटर उध्वस्त

मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये सुरु असलेले बेकायदेशीर कॉल सेंटर उध्वस्त

Published on

नवी मुंबईतील बेकायदेशीर कॉल सेंटर उद्ध्वस्त
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक, २० जणांना अटक

नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये सुरू असलेले बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केले आहे. तसेच शेअर मार्केट ट्रेडिंगमधून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील २० जणांना अटक केली आहे. या छाप्यात जप्त केलेल्या संगणकांच्या तपासणीत फसवणुकीसाठी ७१ बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याचे आढळले आहे. त्यापैकी ६१ खात्यांतून १२.२९ कोटींचा आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाईमुळे देशभरातील सायबर क्राइम पोर्टलवरील ३१ तक्रारी उघडकीस आल्या आहेत.
शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवून नागरिकांची फसवणूक करणारे कॉल सेंटर महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये असल्याची माहिती नवी मुंबईच्या सायबर सेलला मिळाली होती. या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल पाटील व त्यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी मिलेनियम बिझनेस पार्क मधील बिल्डिंग नं.३ मध्ये तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा मारून कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. या कारवाईत पोलिसांनी एकूण २० जणांना अटक केली आहे. त्यातील तीन तरुणींना नोटीस देऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे.
या कारवाईत, द वेल्थ ग्रोथ, द कॅपिटल सर्व्हिसेस, सिग्मा, ट्रेड नॉलेज सर्व्हिसेस आणि स्टॉक व्हिजन अशा नावाखाली चालणाऱ्या पाच बोगस कंपन्यांमध्ये ९७ तरुण-तरुणी शेअर मार्केटमध्ये मोठा नफा’ मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत नागरिकांना जाळ्यात ओढत असल्याचे उघड झाले. या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या संगणकांमधील व्हॉट्सॲप चॅट्स, बनावट गुंतवणूक सल्ला मेसेजेस आणि बँकेची डिटेल्सची तपासणी केली असता, तब्बल ७१ बँक खात्यांचा वापर फसवणुकीसाठी करण्यात आल्याचे आढळले आहे. त्यापैकी ६१ खात्यांतून १२.२९ कोटींचे आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलिसांनी आलेल्या तपासणीत सिद्ध झाले आहे.
--
अमेरिकन नागरिकांवर रात्रीचा ‘सायबर हल्ला’
या रॅकेटचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे रात्रीच्या वेळी ही टोळी आय. टी. मॅक वर्ड सोल्युशन या नावाखाली अमेरिकन नागरिकांच्या संगणकांवर मालवेअर अटॅक करत होते. त्यानंतर त्यांच्या स्क्रीनवर मायक्रोसॉफ्ट एरर कोड असा संदेश आणि कस्टमर सपोर्ट नंबर दाखवला जायचा, तो प्रत्यक्षात कॉल सेंटरमधील व्हीओआयपी नंबर असायचा. अमेरिकन पीडित व्यक्ती मदतीच्या शोधात त्या नंबरवर कॉल करताच कॉल सेंटरमधील कर्मचारी मायक्रोसॉफ्टचे इंजिनिअर असल्याचे भासवून त्यांच्याकडून डॉलर्समध्ये शुल्क उकळत होते. या कॉल सेंटरमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला नागरिकांशी कसे बोलायचे यासाठी स्क्रिप्ट तयार करून देण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे
----
मोठी जप्ती
कारवाईदरम्यान पोलिसांनी २१ सिपीयू, पाच लॅपटॉप, पाच एसएसडी, एक जी एस सर्व्हर, ३८ मोबाईल फोन जप्त केले आहेत. तसेच १०८ संगणकांमधील महत्त्वाचा डिजिटल पुरावा सुरक्षित करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (सायबर) प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोनि गणेश जाधव, वपोनि सुनील शिंदे, वपोनि तानाजी भगत यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. तांत्रिक सहकार्य सायबर तज्ज्ञ अजय पंचोली आणि गौरव कारखेले यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com