तंत्रशिक्षण संचालनालयात संस्थांच्या मान्यता ऑनलाईन
तंत्रशिक्षण संस्थांना ऑनलाइन मान्यता
संचालनालयाचा धाेरणात्मक निर्णय; कारभार होणार सुलभ
मुंबई, ता. २१ : तंत्रशिक्षण संचालनालयाने आता नवीन अभ्यासक्रम, जागावाढ इत्यादींच्या मान्यतेसाठीची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यामुळे आपल्या फायलींना अंतिम मान्यता मिळवण्यासाठी संस्थांची धावपळ कमी होणार आहे. यामुळे संस्थांचा वेळ वाचेल, अनावश्यक कागदपत्री त्रास कमी होईल आणि संपूर्ण कार्यप्रवाह अधिक पारदर्शक व शिस्तबद्ध होईल. नवीन प्रणालीमुळे मान्यता प्रक्रियेला अधिक वेग येणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी सांगितले.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून अंतिम मान्यतेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. नवीन संस्था सुरू करणे, विद्यमान संस्थांत नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, अभ्यासक्रमांच्या जागांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी सर्व माहिती स्वतंत्र पोर्टलवर सादर करावी लागणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया व वास्तुकला परिषद यांच्या मान्यतेच्या अधारे इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए, पीजीडीएम, एमसीए, डिझाइन, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, प्लॅनिंग इत्यादी पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांवरील प्रस्तावांना शासनाची प्राथमिक मान्यता देण्यात येते. त्यानंतरची अंतिम मान्यता देण्याची जबाबदारी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे असते. ही प्रक्रिया आता डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.
संस्थांना अंतिम मान्यतेसाठी आवश्यक माहिती डीटीई संकेतांक आणि पासवर्डचा वापर करून नव्या पोर्टलवर अद्ययावत करावी लागेल. पोर्टलसाठी स्वतंत्र युजर मॅन्युअल जोडले असून, २७ नोव्हेंबरला सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे. पोर्टलवर माहिती भरल्यानंतर ‘सबमिट ॲण्ड लॉक’ हा पर्याय निवडल्यानंतरच अर्ज अंतिम मानला जाणार आहे. पोर्टलवर माहिती भरताना किंवा कागदपत्रे अपलोड करताना काही अडचणी आल्यास संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे निर्देशही संचालनालयाने दिले आहेत.
--
प्रत अपलोड करणे बंधनकारक
संस्थांना संबंधित शिखर परिषदा आणि इतर नियामक मंडळांच्या अटी-शर्तींची पूर्तता संस्थांनी करणे आवश्यक राहते. त्यासाठी ‘संयुक्त खात्यात मुदत ठेव’, आर्थिक दस्तऐवज, करारनामा, इमारतीची माहिती, सुविधा, पात्र शिक्षकांचे तपशील अशा आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. नवीन संस्था व नवीन अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या संस्थांनी ‘विवरणपत्र-अ’मधील कागदपत्रे सॉफ्ट कॉपी स्वरूपात पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.

