पालिका रुग्णालयांना फेरिवाल्यांचा विळखा
पालिका रुग्णालयांना फेरीवाल्यांचा विळखा
रुग्णांना चालायलाही जागा नाही; कारवाईकडे दुर्लक्ष
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः परळ परिसरातील महत्त्वाच्या रुग्णालयांसमोरील पदपथांवर दिवसेंदिवस फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढतच चालले आहे. केईएम, वाडिया, टाटा, नायर आणि सायन या रुग्णालयाच्या पदपथांवर फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईक आणि प्रसंगी डॉक्टरांनाही याचा त्रास होत आहे. टाटामध्ये तर उपचाराला येणाऱ्या रुग्णांना कुणी केव्हाही धक्का मारेल, अशी परिस्थिती आहे.
परळ परिसरातील प्रमुख पालिका रुग्णालयांच्या बाहेरील मोकळ्या जागेत व पदपथांवर दुकाने थाटली आहेत. यात वडापाव, पाणीपुरी, भेळपुरी, सँडविच आणि दाबेलीसारख्या खाद्यपदार्थांची विक्री होते.
केईएमच्या हृदयविकारतज्ज्ञ असलेल्या एका डॉक्टरांनी सांगितले, की हृदयाचा झटका, पक्षाघाताचे अनेक रुग्ण आपत्कालीन परिस्थितीत दाखल होतात. रुग्णवाहिका किती वेळ त्याच वाहतूक कोंडी ट्रॅफिक आणि गर्दीत अडकते. फेरीवाल्यांमुळे नागरिक खाण्या-पिण्यासाठी या स्टॉलवर थांबतात, त्यामुळे गर्दी वाढते.
केईएम रुग्णालय की खाऊगल्ली?
केईएम रुग्णालयांतर्गत असलेल्या सीव्हीटीसी इमारतीच्या बाहेर जवळपास १० ते १२ फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. या इमारतीत हृदयविकारांनी ग्रस्त रुग्णांचे उपचार केले जातात; मात्र इमारतीच्या परिसरातील खाऊगल्लीमुळे प्रचंड गर्दी होत असून त्याचा त्रास आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या रुग्णांना सहन करावा लागतो. याशिवाय, या गर्दीमुळे रुग्णवाहिकांच्या वाहतुकीत गंभीर अडथळे निर्माण होतात. या पदपथांकडे पाहिल्यास हा रुग्णालय परिसर आहे की खाऊ गल्ली, असा सवाल उपस्थित होतो. केईएम रुग्णालयासमोर एकीकडे अवैध वाहन पार्किंग आणि दुसरीकडे फेरीवाले दिसतात.
कचराही वाढला
केईएम रुग्णालयाच्या एका डॉक्टरांनी सांगितले, की आम्ही फेरीवाल्यांच्या बाबतीत वारंवार तक्रार केली आहे. तीन ते चार वेळा पालिका प्रशासनाकडे पाठपुरावाही केला; मात्र आमच्या तक्रारींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. या स्टॉलमुळे रुग्णवाहिकेच्या मार्गिकेत अडथळे येतात. या परिसरात अनेक स्वयंसेवी संस्था रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत जेवणाचे वाटप करतात. अनेकदा नागरिक जेवण झाल्यानंतर उर्वरित खाद्यपदार्थ व कचरा रुग्णालय परिसरातील बगिच्यात फेकून देतात.
कर्करोगग्रस्त रुग्णांना चालणेही अवघड
टाटा मेमोरियल रुग्णालयात कर्करोगाच्या उपचारांसाठी देशभरातून रुग्ण येतात. रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व पदपथांवर फेरीवाल्यांचीही गर्दी वाढली आहे. उपचारादरम्यान नाकात नळी घातलेल्या रुग्णांना चालण्यासाठी जागा शिल्लक राहिली नसल्याचे चित्र आहे. अनेकांनी एकतर पदपथावर स्टॉल टाकले आहेत किंवा काही दुकानांनी अनधिकृतपणे पदपथावर हातपाय पसरले आहे. दुचाकी वाहनेदेखील या पदपथावरून सर्रास चालवली जातात. अनेक कर्करोगग्रस्त रुग्ण अत्यवस्थ असतात, त्यांना चालायला त्रास होतो. या परिस्थितीत कुणीही त्यांना धडकेल, अशी भीती कायम आहे.
पालिकेकडे आम्ही नेहमी तक्रार करतो. पालिका प्रशासन फेरीवाल्यांना उठवते. काही दिवसानंतर फेरीवाले परत येतात. स्थानिक नागरिकांपासून ते रुग्णांपर्यंत सर्वांना चालायला खूप त्रास होतो.
- श्रीपाद नाडकर्णी,
रहिवासी, परळ
अतिक्रमणांमुळे रुग्णांना चालायला जागा नसते. आरोग्य ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. रुग्णालयाची परिस्थिती सुधारणे पुढची गोष्ट आहे. कमीत कमी रुग्णालयाच्या पदपथावरचे अतिक्रमण तरी हटवून दाखवावे.
- श्रीरंग बरगे,
सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस
रहिवासी, परळ
‘शताब्दी’बाहेर दुकानदारांची दादागिरी
कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयाबाहेरच्या संपूर्ण पदपथावर खाण्या-पिण्याच्या गाड्या, पान-मसाला स्टॉल, छोट्या वस्तू विकल्या जातात. शताब्दी रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले, की रुग्णवाहिका, रुग्ण आणि नातेवाइकांना त्रास होतोच; पण डॉक्टरही या त्रासाला कंटाळले आहेत. बुर्जीपाव विकणारे गाडीवाले रात्रीची दादागिरी करतात.
नायरच्या प्रवेशद्वारावर स्टॉल
नायर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच फेरीवाल्यांनी खाण्या-पिण्याचे स्टॉल थाटले आहेत. या अनधिकृत स्टॉलमध्ये लोक जेवायला बसल्यानंतर पदपथ पूर्ण बंद होतो. हे अतिक्रमण हटवल्यास रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना रुग्णालयात येणे-जाणे सोयीचे होईल. वाॅर्ड अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.
कारवाईचा दिखावा
स्थानिक नागरिकांनी अनेकदा अतिक्रमणासंदर्भात तक्रारी केल्या; मात्र केवळ दिखाव्यासाठी पालिकेकडून कारवाई केली जाते. कारवाई करण्यापूर्वी महापालिकेचे काही कर्मचारी फेरीवाल्यांना टीप देतात. त्यानंतर कारवाईदरम्यान हे फेरीवाले भंगारातील वस्तू कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देतात. या जुन्या वस्तू असल्याने त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही व दहा मिनिटांत पुन्हा जैसे थे स्थिती दिसून येते, असा आरोप होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

