मुंबईकरांना हुतात्म्यांचा विसर

मुंबईकरांना हुतात्म्यांचा विसर

Published on

मुंबईकरांना हुतात्म्यांचा विसर
स्मारकाला अभिवादनासाठी ना तरुणाई, ना सामान्य माणूस

नितीन जगताप ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : २१ नोव्हेंबर हा दिवस ‘हुतात्मा स्मृतिदिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणाचे बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांचे आज सर्वत्र स्मरण करण्यात आले. मात्र, फोर्टसारख्या गजबजलेल्या भागातील हुतात्मा स्मारकाकडे, नेतेमंडळी वगळता सामान्य मुंबईकर, विशेषतः तरुणाई फिरकताना दिसली नाही. ज्यांच्या त्यागामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्याबद्दल आजच्या पिढीची आस्था कमी होत चालली आहे, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली.
हुतात्मादिनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्यासह विविध नेत्यांनी फोर्ट येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. दिवसभर स्मारकाकडे राजकीय नेत्यांची वर्दळ होती; मात्र सामान्य मुंबईकर आणि मराठी तरुणाई या दिवसापासून बरीच अलिप्त असल्याचे चित्र होते. अनेकांनी बाहेरून छायाचित्रे काढणे पसंत केले, प्रत्यक्ष हुतात्मा स्मारकात जाऊन माथा टेकवणाऱ्या युवकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. फोर्ट हा तसा कायम वर्दळीचा भाग आहे. येथे अनेक कॉर्पोरेट कार्यालये आहेत. घरी परतताना स्मारकाची सजावट पाहून अनेक जण थांबून छायाचित्रे घेताना दिसले. त्यापैकी अनेकांशी ‘सकाळ’ने संवाद साधला, त्यामध्ये फार कमी तरुणांना आज हुतात्मा दिवस असल्याची जाणीव होती.
‘हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी चपला बाहेर काढाव्या लागतात. त्यामुळे काही तरुणांनी आत जाणे टाळले,’ असे सांगितले. ‘स्मारकासमोर कोणताही सूचनाफलक नसल्याने, सामान्यांना येथे प्रवेश आहे की नाही, हेच कळत नव्हते,’ अशी प्रतिक्रिया प्रदीप यांनी दिली. हा शासकीय कार्यक्रम असल्याचे आम्हाला वाटते, अशी प्रतिक्रिया एका तरुणाने दिली. ‘हे धावपळीचे शहर आहे. सर्व जण जगाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करीत आहेत. या धावपळीत लोकांच्या भावना आटत चालल्या आहेत. तरीही संस्कृती आणि इतिहासाचा विसर पडू नये,’ असे आकाश पवार तरुणाने सांगितले. या हुतात्म्यांवर शालेय पाठ्यपुस्तकात एकही धडा नाही. गुगल, विकिपीडिया, शासकीय वेबसाईटवर त्यांची माहिती नाही. त्यामुळे नवी पिढी पूर्णतः अनभिज्ञ आहे, असे लोकशाहीर आत्माराम पाटील यांची पत्नी इंद्रायणी पाटील यांनी सांगितले.
...
मी बेळगावचा आहे. महाराष्ट्रासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपल्याकडे दोन मिनिटेही वेळ नाही, हे पाहून मनाला वेदना होतात. आम्ही बेळगावात आजही महाराष्ट्रात येण्यासाठी लढतोय.
- सोमनाथ सावंत, बेळगाव
...
या भागात मी कामाला आहे. दरवर्षी मी आवर्जून येथे अभिवादन करायला येतो; मात्र ८० टक्के लोकांना या दिवसाबद्दल माहिती नाही. हे हुतात्मा मुंबई मिळवण्यासाठी हुतात्मा झाले याची त्यांना माहिती नाही, याची खूप खंत वाटते.
- राजेश धनू, माहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com