विमानतळ वाहतूक नियमनकरिता विशेष पोलिस दल

विमानतळ वाहतूक नियमनकरिता विशेष पोलिस दल

Published on

विमानतळ वाहतूक नियमनाकरिता विशेष पोलिस दल
नवी मुंबई पोलिसांना १७५ नवीन पोलिस मंजूर
सुजित गायकवाड, सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वाहतूक नियमन करण्यासाठी गृह विभागाने नवी मुंबई पोलिसांना १७५ नवीन पोलिस बळाची मंजुरी दिली आहे. यामुळे वाहतूक पोलिसांची ताकद वाढणार आहे. २५ डिसेंबरपासून विमानतळावरील वाहतूक नियमन सुरू होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या प्रमुख चार मार्गांद्वारे शहराशी जोडलेले आहे. आम्र मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४ ब, सायन-पनवेल महामार्ग आणि पामबीच मार्ग या चार मुख्य मार्गांमुळे आंतरराष्ट्रीय आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी विमानतळाचे प्राथमिक प्रवेश मार्ग होणार आहेत. आगामी काळात विमानतळाच्या वाहतूक सुलभतेसाठी सिडको व राज्य सरकारकडून वेगात प्रयत्न चालू आहेत. मुख्य घोषित योजना तीन आहेत. उलवे कोस्टल रोड, खारघर बेलापूर-सीबीडी कोस्टल रोड आणि राज्याने मंजूर केलेला सुमारे २५ किमी लांबीचा ठाणे-नवी मुंबई एलिव्हेटेड मार्ग यामुळे एमटीएचएल आणि सिटी जोडणी अधिक जलद व व्यत्ययमुक्त होणार आहे. या तिन्ही उपक्रमांमुळे विमानतळापर्यंत थेट, वेगवान आणि गर्दी कमी करणारे मार्ग उपलब्ध होतील. विमानतळाकडे जाण्यासाठी फक्त रस्ते बनवणे पुरेसे नसून रिअल टाइम ट्रॅफिक मॅनेजमेंट, अपघात किंवा वाहतुकीच्या ओघात तत्काळ हस्तक्षेप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्याकरिता राज्य गृह विभागाने विमानतळ वाहतूक विभागासाठी १७५ नवीन पोलिस पदांची मंजुरी दिली आहे. ही पदरचना विमानतळ पोलिस ठाण्याच्या स्थापनेसाठी आणि वाहतूक कोंडी व्यवस्थापनासाठी ठेवण्यात येत आहे. यामुळे विमानतळावरील तातडीच्या प्रतिसाद वेळा कमी होतील. वाहतुकीचे मार्गदर्शन सुलभ होणार आहे. प्रवासी आगमनाच्या वेळी होणारा खोळंबा कमी होणार आहे.
-----------------------------------
विशेष पोलिस दलाचे प्रमुख कार्य
- आम्र मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४ ब, सायन-पनवेल महामार्ग आणि पामबीच मार्ग यांसारख्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक कोंडी टाळणे.
- आगमन-निर्गमनाच्या वेळी होणारा खोळंबा कमी करणे, पिकअप/ड्रॉप झोन आणि वाहनतळाची व्यवस्था पाहणे.
- तातडीच्या घटनांसाठी जलद प्रतिसाद युनिट्स आणि रिअल टाइम ट्रॅफिक मॉनिटरिंग करणे.
-----------------------------------------
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर वाहनांची संख्या पाहता वाहतुकीच्या अनुषंगाने अधिकचे लक्ष देण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ती ठिकाणे शोधून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन केले जाणार आहे. इतर सरकारी यंत्रणांच्या मदतीने वाहतूक कोंडीची ठिकाणे शोधून त्या ठिकाणी अत्याधुनिक प्रणालीच्या मदतीने विमानतळाकडे जाणारी रस्ते वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे.
- तिरुपती काकडे, वाहतूक पोलिस उपायुक्त, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com