उल्हासनगरातील सर्व शाळांत ‘माजी विद्यार्थी संघ’ अनिवार्य; शासनाचा मोठा निर्णय
उल्हासनगरातील सर्व शाळांत ‘माजी विद्यार्थी संघ’ अनिवार्य
शाळा आणि माजी विद्यार्थी नाते भक्कम करण्यासाठी सरकारचा पुढाकार
उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : परिसरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये आता माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे अनिवार्य ठरणार आहे. राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार शाळेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक मजबूत करण्यासाठी आणि शैक्षणिक, भौतिक विकासाला नवीन दिशा देण्यासाठी उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाने सर्व शाळांना तातडीने संघ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळेच्या घडणीमुळे मोठ्या पदांवर आणि विविध क्षेत्रांत झळकणारे असंख्य माजी विद्यार्थी आता पुन्हा आपल्या शाळेशी अधिक दृढ नात्याने जोडले जाणार आहेत.
उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शहरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत. शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण घडणीची प्रथम पायरी आहे. शाळेतील ज्ञान, संस्कार आणि मूल्यांमुळे तयार झालेली पिढी आज प्रशासन, राजकारण, समाजसेवा, संशोधन, व्यापार, उद्योग, शेती अशा विविध क्षेत्रांत राज्यभर उत्तुंग स्थान मिळवताना दिसते. अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या विकासात भरीव योगदान दिल्याची उदाहरणे छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांत आढळतात.
या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाने सर्व शाळांना निर्देश दिले आहेत की, इयत्ता १ ते १२ या एकत्रित स्तरावर माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून माजी विद्यार्थी संघ स्थापन करावा आणि त्याचा अहवाल तातडीने शिक्षण विभागाकडे सादर करावा.
या माजी विद्यार्थ्यांची ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करणे. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन प्रणालीवर सर्व माजी विद्यार्थ्यांची माहिती भरणे. प्रत्येक शाळेने वर्षातून किमान एक माजी विद्यार्थी मेळावा आणि दोन समिती बैठकांचे आयोजन अनिवार्य केले आहे.
माजी विद्यार्थी संघाकडून अपेक्षित योगदान :
शाळेतील भौतिक व पूरक सुविधा विकसित करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य
शैक्षणिक दर्जा, विद्यार्थी गुणवत्ता व कौशल्यविकासासाठी सहकार्य
पालकांमध्ये शाळेचे महत्त्व आणि भावनिक नाते दृढ करणे
आर्थिक पारदर्शकतेसाठी रोख रक्कम न स्वीकारता आवश्यक सुविधा / वस्तुरूप मदत देण्यावर भर
योगदान देण्याची सुवर्णसंधी
ज्या शाळांनी आधीच माजी विद्यार्थी संघ स्थापन केला आहे त्यांनी त्याची सविस्तर माहिती स्वतंत्र लिंकवर तातडीने भरावी. ज्यांनी अद्याप संघ स्थापन केला नाही, त्यांनी तातडीने संघ स्थापन करून कार्यवाही सुरू करावी. या निर्णयामुळे उल्हासनगरातील हजारो माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेशी पुन्हा एकत्र येण्याची आणि शाळेच्या उभारणीत थेट योगदान देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. शाळा माजी विद्यार्थी संबंधांचा नवा अध्याय आता सुरू होणार आहे, असे शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी दीपक धनगर यांनी म्हंटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

